रत्नागिरी :  रत्नागिरी जिल्ह्यात बुधवारी दुपार पासून वादळी वा-यासह विजांच्या कडकडाट करत मुसळधार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. तर दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांनी गजबजलेल्या बाजारपेठांना या पावसाचा चांगलाच फटका बसला.

रत्नागिरी जिल्ह्यात गेले काही दिवस ऑक्टोबर हिट चांगलीच जाणवू लागली होती. या वाढत्या उन्हाचे चटके सहन न होण्यासारखे बसू लागले होते. मात्र बुधवारी दुपार पासूनच पावसाने जिल्ह्याच्या सर्वच भागात विजांच्या कडकडाटासह  हजेरी लावल्याने वाढलेल्या उष्णते पासून जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे. मात्र पडत असलेल्या या पावसाने शेतकरी वर्गाची दाणादाण उडविली आहे.

कोकणात भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर पीक घेण्यात येते. ही भात शेतीच्या काढणीची कामे शेतकरी लोक दिवाळी पुर्वी करत असतात. जिल्ह्यात अशा भात शेती कापणीची कामे सुरु असताना पावसाने अचानक हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. भात शेतीचे पीक कापून वाळत ठेवलेले असल्याने आता हाता तोंडाशी आलेल्या पिकावर पावसाने पाणी फेरले आहे. यामुळे शेतकरी चांगलाच हवालदील झाला आहे.

दिवाळीचा सण तोंडावर आल्याने जिल्ह्यातील बाजार पेठा ही ग्राहकांनी गजबजल्या असताना पावसाने हजेरी लावून व्यापाऱ्यांने  मोठे आर्थिक नुकसान केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच या पावसामुळे शेतकरी व व्यापारी मेठाकूटीला आला आहे.

हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यात पावसाने जोरदार पडण्यास पुन्हा सुरुवात केली आहे. जिल्ह्यात कोसळणाऱ्या यापरतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून तळे झाले आहे. तर याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेला देखील बसला आहे.