सांगली : गेले तीन दिवस दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी दुपारपासून सांगलीत दमदार हजेरी लावली. दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने सायंकाळी उशिरापर्यंत रिमझिम हजेरी सुरूच ठेवली होती. ग्रामीण भागातही कमी अधिक व खंडित स्वरूपात शुक्रवारी पावसाने हजेरी लावली.

गेल्या तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, आज सकाळपासून ढगाळ हवामान होते. दुपारी बारा वाजेनंतर रिमझिम पाऊस सुरू झाला. वाहनधारकांची मात्र त्रेधा उडाली. दोन वाजता दमदार पावसाच्या सरी कोसळल्या. सुमारे दोन तास तो सुरू राहिल्याने सखल भागात पाणी साचले होते. पाण्यामुळे वाहनधारकांना कसरत करत वाहन चालवावे लागत होते. पावसाने रस्त्यावर विक्री करणारे पथ विक्रेत्यांची मोठी तारांबळ उडाली. रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने पाणी साचून राहिल्याने वाहनधारकांना खड्डे चुकवत वाहन चालविणे जिकीरीचे ठरत होते.

दरम्यान, नवरात्री निमित्त अनेक ठिकाणी रास गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज रास गरबा खेळण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. सार्वजनिक रस्त्यावर काही मंडळाकडून दररोज रात्री गरबा नृत्याचे आयोजन करण्यात येत आहे. पावसाने या उत्साहावर पाणी फिरले.

ग्रामीण भागातही दमदार पाऊस झाला असून, रानात अगोदरच्या पावसाने ओल झाली असल्याने मध्यम पावसानेही पाणी साचले आहे. सोयाबीनची काढणी सुरू करण्याच्या तयारीत असतानाच पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने खरीप काढणी लांबणीवर पडली. द्राक्षाची फळछाटणीही हवामान बदलामुळे लांबणीवर टाकावी लागली आहे.

फळबागा, पिकांचे नुकसान

कायम दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्याच्या पूर्व भागातील जत, कवठेमहांकाळ आणि आटपाडी या तालुक्यात परतीच्या मान्सूनने धुमाकूळ घालून ९१ गावात द्राक्ष, डाळिंब या फळ पिकांबरोबरच जिरायत शेतीचेही मोठे नुकसान केले आहे. जतच्या पूर्व भागातील संख अप्परमधील माडग्याळ, मुचंडी व तिकोंडी या कर्नाटक सीमेलगत असलेल्या भागात सरासरीच्या दीड पट पाऊस एकाच दिवशी झाल्याने काढणीला आलेली सोयाबीन, उडीद, मका, बाजरी ही पिके पाण्यात गेली आहेत.

यंदाच्या हंगामात १३ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या पावसाने सलग जोरदार हजेरी लावली. दरवर्षी याच पावसावर जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती केली जाते. यावर्षी मान्सूनपूर्व पाऊस मे महिन्याच्या १० तारखेपासूनच सुरू झाला. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी खरिपाचा पेराही केला. हंगाम चांगला लाभणार असे वाटू लागल्याने खरिपातील बाजरी, मका, कांदा, सोयाबीन यांसह कडधान्याची मोठ्या प्रमाणात पेरणी केली. जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात कमी अधिक पाऊस पडला असल्याने खरीप पिकेही चांगली साधली होती. सप्टेंबरमध्ये खरिपाची काढणी केल्यानंतर रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई या पिकांची पेरणी करायची या तयारीत बळीराजा असतानाच परतीच्या पावसाने या परिसरात धुमाकूळ घातला.