कायम दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्याच्या पूर्व भागातील जत, कवठेमहांकाळ आणि आटपाडी या तालुक्यात परतीच्या मान्सूनने धुमाकूळ घालून ९१ गावांत द्राक्ष, डाळिंब या फळ पिकांबरोबरच जिरायत शेतीचेही मोठे नुकसान केले आहे. जतच्या पूर्व भागातील संख अप्परमधील माडग्याळ, मुचंडी व तिकोंडी या कर्नाटक सीमेलगत असलेल्या भागात सरासरीच्या दीडपट पाऊस एकाच दिवशी झाल्याने काढणीला आलेली सोयाबीन, उडीद, मका, बाजरी ही पिके पाण्यात गेली आहेत.

१३ सप्टेंबरपासून पावसाने सलग जोरदार हजेरी लावली. दरवर्षी याच पावसावर जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती केली जाते. यावर्षी मान्सूनपूर्व पाऊस मे महिन्याच्या १० तारखेपासूनच सुरू झाला. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी खरिपाचा पेराही केला. हंगाम चांगला लाभणार असे वाटू लागल्याने खरिपातील बाजरी, मका, कांदा, सोयाबीन यांसह कडधान्याची मोठ्या प्रमाणात पेरणी केली. जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात कमी अधिक पाऊस पडला असल्याने खरीप पिकेही चांगली साधली होती. सप्टेंबरमध्ये खरिपाची काढणी केल्यानंतर रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई या पिकांची पेरणी करायची या तयारीत बळीराजा असतानाच परतीच्या पावसाने या परिसरात धुमाकूळ घातला.

जत पूर्व भागातील माडग्याळ मंडळ हे प्रामुख्याने बाजरीचे आगार म्हणून गेल्या चार वर्षांपासून देशपातळीवर ओळखले जाते. एकरी ४३ क्विंटल बाजरीचे उत्पादन घेणाऱ्या माडग्याळ परिसरात १८ सप्टेंबर रोजी एका रात्रीत १३३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर याच रात्री मुचंडी मंडळात ७६.५ आणि तिकोंडी मंडळात ८२.३ मिलीमीटर पाऊस कोसळला. बोर नदी वाहती झाली. अचानक पडलेल्या बेमाप पावसाने बाजरीचे पीक पाण्यात गेले. तसेच मका कणसासह भुईसपाट झाला. काढणीला आलेले सोयाबीन पिकात दोन ते तीन फुटांनी पाणी साचले. म्हैसाळ सिंचन योजनेच्या लाभापासून हा भाग अद्याप वंचित आहे. यंदा कधी नव्हे तो साधलेला खरीप हंगाम होत्याचं नव्हतं करून गेला.

जतबरोबरच आटपाडी, कवठे महांकाळ तालुक्यातही हा पाऊस बरसला. आटपाडीमध्ये टेंभू योजनेचे आणि कवठेमहांकाळ तालुक्यात म्हैसाळ योजनेचे पाणी फिरत असल्याने जिरायतकडून अनेक शेतकरी द्राक्ष, डाळिंब पिकाकडे वळला आहे. परतीच्या मान्सूनने द्राक्षाच्या फळछाटणीचे वेळापत्रकच बदलले आहे. तर अतिपावसाने द्राक्षाच्या खोडावर मुळ्या फुटू लागल्याने हंगाम वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. डाळिंबाचा मृग बहार घेण्याच्या तयारीत शेतकरी असताना नवी फुलकळी जोरदार पावसाने पाण्यात गेली आहे.

कोवळे फळ पावसाने कुजून गळू लागले आहे. जिल्हा कृषी अधीक्षक विवेक कुंभार यांच्या माहितीनुसार पीकनुकसानीच्या पंचनाम्याचे काम सुरू असून नजरअंदाजानुसार सप्टेंबरमधील पावसाने तीन तालुक्यांतील नऊ हजार २०५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचा फटका ९१ गावांतील १७ हजार ४३४ शेतकऱ्यांना बसला आहे. एप्रिल, मे, जून आणि ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीने पश्चिम भागातील १५ हजार ३९९ शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून शासनाने ९०७ कोटी ७९ लाख रुपये नुकसानभरपाई मंजूर केली आहे.