परभणी : वाहून गेलेल्या जमिनीवरील मातीमोल झालेली पिके, सोयाबीन, कापूस या दोन्ही नगदी पिकांनी केलेली निराशा या पार्श्वभूमीवर दसरा सणावर अक्षरशः काजळी असल्याचेच चित्र होते. दसऱ्याच्या निमित्ताने झेंडूच्या फुलांना चांगली मागणी असेल आणि अनेक ठिकाणची फुलांची शेती अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडल्याने उपलब्ध फुलांना दरही चांगला मिळेल अशी अपेक्षासुद्धा खोटी ठरली. सकाळी ८० रुपये किलो प्रमाणे विकली जाणारी झेंडूची फुले शेवटी ४० ते ५० रुपये किलोवर आल्याने फुल उत्पादक शेतकऱ्यांचाही हिरमोड झाला.
यंदाच्या दसऱ्यावर अतिवृष्टी व पूर परिस्थितीचे सावट होते. या दिवसात मूग, उडीद या पिकांची काढणी होते. ही दोन्ही पिके अडीच ते तीन महिन्यांची असल्याने शेतकऱ्यांना या पिकांचा आधार होतो. किंबहुना सणवार साजरे करण्यासाठीच या पिकांचे पैसे कामी येतात. सोयाबीन काढणीची तसेच कापूस वेचणीची तयारी या दिवसात सुरू असते. दिवाळीच्या आधीच चालू हंगामातल्या कापसाच्या वाती दिव्यांसाठी मिळतात. बऱ्याचदा या पिकांच्या जोरावर सण उत्सव साजरे होतात. यंदा मात्र या दोन्ही पिकांनी निराशा केली आहे. परभणी जिल्ह्यात खरीपाखालील क्षेत्र हे साडेपाच लाख हेक्टरच्या आसपास आहे. त्यातील बहुतांश क्षेत्राला अतिवृष्टी व पूरस्थितीचा फटका बसला आहे.
यावर्षीच्या दसरा सणावर अतिवृष्टीचे सावट दिसून आले. कोणताही शेतमाल न आल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक नाड्या आवळलेल्या होत्या. त्यामुळे बाजारातही फारशी वर्दळ नव्हती. याचा परिणाम खरेदी-विक्रीवर आणि व्यवहारावर झाला. अतिवृष्टीमुळे पिके गेल्याने शेतमजुरीचेही कोणतेच काम उरले नाही. त्यामुळे शेतमजुरांच्याही हाती पैसा नसल्याने दसऱ्याची बाजारपेठ थंड होती. शेतकरी व शेतमजूर हे दोन्ही घटक संकटात असल्याने परभणीच्या बाजारपेठेत दसऱ्याची उलाढाल फारशी झाली नाही.
दरवर्षी दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर झेंडूची फुले बाजारात मोठ्या प्रमाणात येतात. शहरातील गांधी पार्क, क्रांती चौक, जिंतूर रस्ता, वसमत रस्ता या ठिकाणी शेतकऱ्यांनी झेंडूच्या फुलांचे ढीगच्या ढीग विक्रीसाठी लावले होते. सुरुवातीला बाजारात या फुलांचा दर ८० रुपये प्रति किलो असा होता. अवघ्या काही तासात हे दर खाली उतरले. शेवटच्या टप्प्यात झेंडूच्या फुलांना ४० ते ५० रुपये किलो असा दर होता. त्यामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांचीही निराशा झाली.
ग्रामीण भागातही दसरा सणावर उदासीचेच चावट होते. कुठेही उत्साह दिसून आला नाही. कुठल्याही सजावटीविना आणि नव्या कपड्याविना दसरा पार पडला. आता दिवाळी तोंडावर असली तरी कोणत्याच शेतमालाचा पैसा हाती येणार नसल्याने दिवाळी येण्यापूर्वीच उत्साह आटला आहे. दसरा दिवाळी दरम्यानची रंगरंगोटी, सजावट ग्रामीण भागात कुठेच दिसून आली नाही. एकूणच अतिवृष्टी आणि पूरस्थितीने दसरा दिवाळीचे चैतन्य घालवले आहे.