सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यात आज दुपारपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, मळगाव घाटात झालेल्या भीषण अपघातात मॉन्सी पी. मॅथ्यू (६०, मूळ केरळ, सध्या शिरोडा नाका सावंतवाडी) या सेवानिवृत्त आरोग्य सेवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली. याचबरोबर, शहरातील अनेक भागांमध्ये साडेसहा तास वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सावंतवाडी तालुक्यात अवकाळी पाऊस झाल्याने रस्ते निसरडे झाले होते. मळगाव घाटातून सावंतवाडीच्या दिशेने दुचाकीवरून येत असताना मॅथ्यू यांची दुचाकी गटारातील दगडगोटे रस्त्यावर आल्याने स्लिप झाली आणि समोरून येणाऱ्या एका नॅनो कारला धडकली. या अपघातात मॅथ्यू रस्त्यावर पडल्याने त्यांच्या हाता-पायांना आणि छातीला गंभीर दुखापत झाली.

नॅनो कार चालकाने तातडीने त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांचे एक्स-रे आणि सिटी स्कॅन करण्यात आले. पुढील उपचारांसाठी नेत असतानाच त्यांना चक्कर येऊन ते कोसळले आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार करण्यात आले, परंतु त्याचा उपयोग झाला नाही.

मळगाव घाटातील दुरवस्थेमुळे ठाकरे गट आक्रमक, बांधकाम खात्यावर खापर

मळगाव घाटात मुसळधार पावसामुळे दगडगोटे आणि माती रस्त्यावर आल्याने रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. यामुळे दुचाकीस्वार वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दरम्यान घडलेल्या अपघातांना सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरले पाहिजे, असे मत ठाकरे शिवसेना विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी व्यक्त केले.

राऊळ यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांची ‘पोलखोल’ झाल्याचे म्हटले आहे. त्यांनी निदर्शनास आणून दिले की, मळगाव घाटात गटार नसल्यामुळे यापूर्वीही एकदा पावसाचे पाणी जाऊन मोरी कोसळली होती आणि काही दिवस रस्ता बंद होता. ही बाब सार्वजनिक बांधकाम खात्याला माहिती असूनही, त्यांनी आणि वन खात्याने गॅस पाईपलाईन गटाराच्या बाजूने, गटारातून टाकण्यास परवानगी दिली. ही एक मोठी चूक होती आणि आता सार्वजनिक बांधकाम खात्याला त्याची जाणीव होईल, असे राऊळ म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सावंतवाडी शहर साडेसहा तास काळोखात! आज मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे सावंतवाडी शहरातील भटवाडी व माठेवाडा परिसरातील वीज वाहिन्यांवर झाडे कोसळली, त्यामुळे वीज खंडित झाली. सुमारे १५ वीज पोल आणि तारा तुटल्यामुळे सायंकाळी चार वाजता वीज खंडित झाली ती रात्री १०:३० वाजता पुन्हा सुरू झाली. वळीवाचा पाऊस वादळीवाऱ्यासह कोसळला आणि वीज वितरण कोलमडून गेल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.