सांगली : शनिवारी सुरू झालेल्या उत्तरा नक्षत्राच्या पावसाने दुष्काळी तालुक्यात दमदार हजेरी लावली असून यामुळे खरीप हंगामातील सोयाबीनचे नुकसान झाले असून रब्बी पिकांच्या पेरणीसाठी आता पाऊस थांबण्याची गरज आहे. दरम्यान, चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणातून सोमवारी सकाळपासून ४ हजार ९८० क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने वारणेकाठी सतर्क राहण्याचा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे.

गेले तीन दिवस पश्चिम भागात दमदार पडत असलेल्या पावसाने रात्रीपासून पूर्व भागातील दुष्काळी क्षेत्रात दमदार हजेरी लावली. यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद या पिकांचे नुकसान होणार आहे. कारण ही पिके काढणीच्या स्थितीत आहेत. काढणीला आलेल्या पिकात पाणी साचले असून सोयाबीन काढणी आणि मळणी कशी आटोपून रब्बी हंगामासाठी रान तयार करणे शेतकऱ्यासमोर आता आव्हान उभारले आहे.

गेले तीन दिवस जिल्ह्याच्या विविध भागात पाऊस सुरू आहे. काल दुपारपासून सांगली, मिरजेसह शिराळा, इस्लामपूर भागात पावसाचा जोर कमी झाला होता. रविवारी रात्री ढगांच्या गडगडाटासह पूर्व भागातील कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर या दुष्काळी तालुक्यांत पावसाने दमदार हजेरी लावली. तालीच्या रानात पाणी साचले असून ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. काल जोर ओसरला असे दिसत असताना सोमवारी दुपारपासून सांगली, मिरज आणि परिसरात पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे.

आज सकाळी आठ वाजता चांदोली धरणातील पाणीसाठा ९९ टक्के म्हणजे ३४.०७ टीएमसी झाला आहे. अद्याप धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी सकाळी नऊ वाजता वक्र दरवाजांद्वारे ३३८० आणि विद्युत गृहातून १६३० असा ४ हजार ९८० क्युसेकचा विसर्ग प्रतिसेकंद करण्यात येत आहे. यामुळे वारणेच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठी सतर्क राहण्याचा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला.

दरम्यान, आज सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १२.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस कवठेमहांकाळ तालुक्यात ३३.८ मिलीमीटर नोंदला गेला. अन्य तालुक्यात झालेला पाऊस असा मिरज ६.३, जत ५.८, खानापूर २५.९, वाळवा ४.८, तासगाव २७.४, शिराळा ८.४, आटपाडी २३.५, पलूस ३.५ आणि कडेगाव १३ मिलीमीटर.