सातारा : पश्चिम साताऱ्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. या भागातील महाबळेश्वर, पाटण व जावली या तालुक्यांमधील डोंगरकपारीतील ३३४ जिल्हा परिषद शाळांना सुमारे दीड महिन्यांची पावसाळी सुटी जाहीर करण्यात आली आहे. १ जुलैपासून या शाळांना सुटी लागली असून, आता १२ ऑगस्टला या शाळा भरणार आहेत.

सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर व जावली तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असतो. यंदा तर पावसाचे प्रमाण अधिक आहे. या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर, जावली व पाटण या तालुक्यातील शाळांना पावसाळी सुटी जाहीर केली आहे. यामध्ये पाटण तालुक्यातील अतिवृष्टी, भूस्खलन बाधीत १८६ शाळा आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील ११८ व जावली तालुक्यातील ३० शाळा आहेत. या भागातील प्राथमिक शाळांना जिल्हा परिषद प्रशासनामार्फत दरवर्षी पावसाळ्यात सुटी देण्यात येते. उन्हाळ्यात मात्र या शाळा सुरू असतात.

यंदा पाऊस अधिक असल्याने विद्यार्थ्यांना शाळेतच जाता येत नाही. महाबळेश्वर, पाटण व जावली तालुक्यामध्ये होणारी अतिवृष्टी व भूस्खलन यामुळे आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होवू शकते. यामुळे विद्यार्थी व शिक्षकांची सुरक्षितता धोक्यात येवू शकते. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागामार्फत पावसाळी सुटी घोषित करण्यात आली आहे. त्यानुसार ३३४ शाळांना पावसाळी सुटी देण्यात आली आहे. ही सुटी दि. १ जुलै ते १२ ऑगस्ट अशी राहणार आहे. सर्व पावसाळी सुटी असणाऱ्या शाळांनी पावसाळी शाळांसाठी असणाऱ्या वेळापत्रकाचे पालन करावे. याबाबतच्या आवश्यक त्या सूचना गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाटण व जावली तालुक्यात होणाऱ्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी प्रमाणे संबंधित शाळांना पावसाळी सुटी घोषित करण्यात आली आहे.अनिस नायकवडी, शिक्षणाधिकारी, प्राथमिक