कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याला मंगळवारी पावसाने झोडपून काढले. सुमारे दोन तासांच्या मुसळधार पावसाने करवीरनगरी जलमय झाली होती. जिल्ह्याच्या सर्व भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्यात आज दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कोल्हापुरात ढगांचा गडगडाट होत पावसाला सुरुवात झाली. मुसळधार पावसाने शहराला चिंब भिजवले. रस्त्यावर पाणी साचले होते.
जयंती नाल्यावर पाणी
शहराच्या मध्य भागातून वाहणाऱ्या जयंती नाल्याचे पाणी रस्त्यावरून वाहत होते. त्यातून वाट काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागत होती. अशीच स्थिती बहुतेक भागात दिसून येत होती. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेच्या नालेसफाईच्या दाव्यातील फोलपणा दिसून आला. पावसाने काही ठिकाणी झाडे पडली.
खोट्या नोटा उधळल्या
कोल्हापुरातील गांधी मैदानाच्या विकासाचे काम रखडले आहे. त्यात साचलेल्या पाण्यात उतरत ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाण्यात खोट्या नोटा उधळून प्रतीकात्मक आंदोलन केले. मैदानासाठी आलेला पाच कोटींचा निधी कोठे गेला याचे उत्तर लोकप्रतिनिधी, कोल्हापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिले पाहिजे. फंड आला असेल तर मैदान अजून पाण्यातच का, असा प्रश्न उपस्थित करीत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला.