अलिबाग- रायगड जिल्ह्यात पावासाचा जोर सलग दुसऱ्या दिवशी कायम आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाची संततधार कायम आहे. माथेरान कर्जत, महाड, पोलादपूर, माणगाव, रोहा या तालुक्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे, त्यामुळे नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. हवामान विभागाकडून जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वादळी काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
शनिवारी दुपारनंतर जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली. रविवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता. अधून मधून मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या सरी कोसळत होत्या रविवारी संध्याकाळनंतर पावसाचा जोर अधिकच वाढला. हा जोर पहाटे पर्यंत कायम होता. त्यामुळे जिल्ह्यात सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या चोविस तासांत सरासरी ९२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
माथेरान येथे सर्वाधिक २७१ मिमी पावसाची नोंद झाली. त्या खालोखाल पनवेल १६५ मिमी, पोलादपूर १५८ मिमी, कर्जत १४६ मिमी, महाड १४७ मिमी, माणगाव ९२ मिमी, अलिबाग ८३ मिमी, उरण ७१ मिमी, म्हसळा ७३ मिमी, पेण मुरुड येथे ४० मिमी तळा येथे ५६ मिमी पावसाची नोंद झाली. रोहा येथे ७० मिमी पाऊस नोंदवला गेला.
अतिवृष्टीमुळे सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास, गाढी नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली होती. नद्या नाले पुन्हा एकदा दुथडीभरून प्रवाही झाले होते. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी वीज पूरवठा खँडीत होणे, वृक्ष उन्मळून पडणे आणि सखल भागात पाणी शिरणे यासारख्या घटना घडल्या.
दरम्यान जिल्ह्यात सोमवारी सकाळपासून पावसाचा जोर कायम असून, जिल्ह्यात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवरील भागात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागात वीजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले होते. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ३ हजार १४८ मिमी पाऊस पडतो, त्या तलनेत या वर्षी कमी पावसाची नोंद झाली आहे. १ जुन के १४ सप्टेंबर पर्यंत सरासरी २ हजार ४२५ मिमी पाऊस नोंदवला गेला आहे. म्हणजेच सरासरीच्या तुलनेत यंदा ८२ मिमी पावसाची नोंद झाली आहे,