सांगली : दिवाळीच्या तोंडावर बुधवारी सांगली, मिरजेसह तासगाव परिसरात पावसाचा धुमाकूळ घातला. या पावसाने दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांची आणि पदपथावर विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांची त्रेधा उडाली. ग्रामीण भागात रब्बी ज्वारीची पेरणीची कामे सुरू असून रब्बी हंगामातील उगवणीला आलेल्या शाळू, हरभरा पिकांना आजचा पाउस लाभदायी ठरला असला तरी द्राक्ष बागांवर रोगांना आमंत्रित करणारा ठरला आहे.
गेल्या आठवड्यात बुधवार दि. ९ ऑक्टोबर रोजी वाळवा तालुक्यातील आष्टा, बहे परिसरात अतिवृष्टी नोंदली गेली होती. आष्टा मंडळात रात्रीमध्ये अवघ्या चार तासात १११ तर बहे मंडळात ८३ मिलीमीटर पाउस झाला होता. दि.१० ऑक्टोबरपासून चित्रा नक्षत्र सुरू झाले असून या नक्षत्राचा पाउस पडेलच याची शाश्वती नसताना आज पावसाने हजेरी लावली.
मंगळवारी सायंकाळपासून पावसाचे वातावरण तयार झाले होते. मात्र, आज दुपारी पावसाचे आगमन झाले. पावसाने शहरातील सखल भागात पाणी साचले होते. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन धारकांची तारांबळ उडाली. दिवाळीच्या खरेदीसाठी अनेक महिला घराबाहेर पडल्या होत्या. मात्र, अचानक पाउस आल्याने त्यांचाही तारांबळ उडाली.
सांगली महापालिकेने दिवाळी साहित्य विक्रीसाठी दत्त-मारूती रोडवर बंदी घातली असून किरकोळ विक्रेत्यांसाठी तरूण भारत स्टेडियमची उत्तर बाजू ते आनंद चित्रमंदिर ते बाजार समितीचे मैदान या रस्त्यावरच आखून दिलेल्या जागेत बसण्यास परवानगी देण्यात आली आहे. आजच्या पावसाने पदपथावर विक्रेत्यांचीही तारांबळ उडाली.
सप्टेबरमध्ये पडलेल्या पावसानंतर घात आलेल्या रानात रब्बी ज्वारी, हरभरा या पिकांची पेरणीची कामे सुरू आहेत. काही रानात रब्बी हंगामातील पिकांची पेरणी झाली असून बियांची उगवणही होत आहे. या पेरणी झालेल्या पिकांना आजचा पाउस उपयुक्त ठरला असला तरी काही शेतकर्यांचे खरीप हंगामातील भुईमूग, मका, सोयाबीन, संकरित ज्वारीची पिके अद्याप रानात उभी असून काढणीला आली आहेत.
आजच्या पावसाने या पिकांना फटका बसला आहे. विशेषता तासगाव तालुक्यातील जिरायत रानात अद्याप पिके उभी आहेत, तर विसापूर, हातनूर, पेड परिसरात झोनल पध्दतीने पेरलेली पाच महिन्याची कार ज्वारी रानात आहे. कणसामध्ये आजच्या पावसाने पाणी साचल्याने ज्वारी काळी पडण्याची भीती आहे.
द्राक्ष पिकालाही आजचा पाउस नुकसानकारक ठरणारा आहे. ज्या बागांमध्ये सप्टेंबरमध्ये गोडी छाटणी झाली आहे त्या बागामध्ये नवीन कोवळे घड बाहेर पडले असून या घडाच्या कोंबामध्ये पाणी साचल्याने घडकूजबरोबरच करपा, दावण्या रोगांचा प्रादुर्भाव वाढणार आहे. चालू महिन्यात ज्या बागांच्या छाटणीची कामे सुरू आहेत त्या बागांना आजचा पाउस धोकादायक नसला तरी बुरशी जन्य रोगांची भीती कायम राहणार असल्याचे शेतकरी विनायक कदम यांनी सांगितले.