अहिल्यानगर : छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा ध्वज सातासमुद्रापार फडकतो. मात्र, सध्या शनिशिंगणापूर देवस्थानाचे काही विश्वस्त मतांसाठी हिंदू देवस्थानाचा सौदा करीत आहेत. निवडणुका येतात आणि जातात. पण देव, धर्म व देश हेच खरे. त्यामुळे जिहादी प्रवृत्तीला आश्रय देणाऱ्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार संग्राम जगताप यांनी केले.शनिशिंगणापूर येथील देवस्थानाने मुस्लिम तरुणांना नोकरी दिली. त्याला विरोध करण्यासाठी आज, शनिवारी सायंकाळी सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मोर्चानंतर झालेल्या सभेत आमदार जगताप बोलत होते. आमदार जगताप यांनी देवस्थानाच्या विश्वस्तांवर जोरदार टीका केली.
या वेळी आमदार विठ्ठलराव लंघे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी तुषार भोसले, हृषीकेश शेटे, सागर बेग आदी उपस्थित होते. या वेळी तुषार भोसले म्हणाले, ‘शनिशिंगणापूर विश्वस्तांनी ११४ मुस्लिम कर्मचाऱ्यांना गैरवर्तनामुळे काढून टाकल्याचे जाहीर केले. म्हणजेच हे कर्मचारी चुकीचे होते, हे त्यांनी मान्य केले आहे. हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. हिंदू समाजाचे हेच यश आहे. मोर्चामध्ये शनैश्वर भक्त, सकल हिंदू समाज, विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
सभेतील ठराव
या वेळी झालेल्या सभेत विविध ठराव करण्यात आले. ते पुढीलप्रमाणे- शनिशिंगणापूरचे पावित्र्य अबाधित राहिले पाहिजे. जिहादी प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांना कामावर ठेवणाऱ्यांचा बंदोबस्त व्हावा. कोणत्याही हिंदूधर्मीय देवस्थानामध्ये इतर धर्मीयांना कामावर ठेवू नये.