कराड : हिंदू एकता आंदोलनाच्या कराड शाखेतर्फे आयोजित यंदाच्या ५५ व्या शिवजयंती उत्सवाला भव्यदिव्य स्वरूप देण्यात आले आहे. शानदार दरबार मिरवणुकीसह विविध कार्यक्रमांनी ‘शिवजयंती उत्सव २०२५’ साजरा करण्यात येईल, अशी माहिती ‘हिंदू एकता’चे प्रांत उपाध्यक्ष विनायक पावसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ‘हिंदू एकता’चे संस्थापक चंद्रकांत जिरंगे, जिल्हा कार्याध्यक्ष राहुल यादव, कराड शहराध्यक्ष प्रकाश जाधव, अजय पावसकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

राज्याच्या अनेक भागात वैशाख शुद्ध द्वितीयेस परंपरेने शिवजयंती साजरी केली जाते. या दिवशी सातारा, सांगली आणि कोल्हापुरात शिवजयंतीनिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या अंतर्गत कराड शहरातील कार्यक्रमाबाबत पावसकर म्हणाले, की वर्ण, जात विसरून जाऊ, हिंदू सारे एक होऊ’ यानुसार हिंदू एकता हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव येत्या २८ ते ३० एप्रिल या कालावधीत कराड परिसरात पारंपरिक पद्धतीने साजरा करीत आहे. त्यात २८ एप्रिलला सायंकाळी सहा वाजता शहरातील चावडी चौकात शिवरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल.

२९ एप्रिलला सकाळी कराड शहर, तसेच तालुक्यातील गावागावांत शिवजयंती मंडळाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार असून, गावोगावी शिवजयंतीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. ३० एप्रिलला सायंकाळी कराड शहरातील पांढरीचा मारुती मंदिरापासून शिवजयंतीच्या दरबार मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. मिरवणुकीच्या प्रारंभी भगवा ध्वज, शिवराय, मावळ्यांच्या वेशातील घोडेस्वार, शस्त्रपथक, चित्ररथ, वारकरी, ढोल-ताशा-झांजपथक आदी पारंपरिक पद्धतीचा साज अनुभवायला मिळणार आहे.

चंद्रकांत जिरंगे म्हणाले, ‘हिंदू एकताच्या शिवजयंती उत्सवाच्या ५५ व्या वर्षानिमित्त तालुक्यातील १५५ गावांत भगवा ध्वज उभारण्याचा संकल्प आहे. त्यानुसार १४० ध्वज उभारलेही असून, शिवजयंतीपूर्वी अन्य ठिकाणांचे ध्वज उभारले जातील.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रकाश जाधव म्हणाले, ‘हिंदू धर्मासाठी कार्य करणाऱ्यांसाठी या वर्षीपासून हिंदू एकता आंदोलनातर्फे हिंदू योद्धा, प्रचारक, संघटक आणि रणरागिणी असे चार पुरस्कार देण्यात येणार आहेत. तसेच दर वर्षीप्रमाणे उत्कृष्ट चित्ररथ, पारंपरिक वेशभूषा आदींचे अनुक्रमे तीन विजेते निवडण्यात येणार आहेत.