हिंगोली : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी ४०२.४५ कोटींचा निधी मंजूर झाला असला तरी बांधकामापूर्वी १३ प्रकारच्या ना हरकतीची गरज असल्याचे सांगण्यात आले. केंद्र शासनाच्या वतीने या कामासाठी कॉन लिमिटेड या संस्थेच्या पथकाने जागेची मोजणी पूर्ण केली. तीन महिन्यांच्या कालावधीत या प्रक्रिया पूर्ण केल्या जातील, असे सांगण्यात आले.

वैद्यकीय महाविद्यालय बांधकामासाठी ४ मार्च २०२५ रोजी निविदा निघाल्या. छत्तीसगड येथे बांधकाम व्यावसायिक कंपनी हे काम करणार आहे. शासकीय महाविद्यालयाला ३ ऑक्टोबर २०२४ रोजी मान्यता मिळाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. ५ नोव्हेंबर २०२४ पासून अभ्यासक्रमाला सुरुवात झाली. महाविद्यालयाची सुसज्ज इमारत व्हावी, म्हणून शासकीय पशुपैदास प्रक्षेत्राची ३८ एकर जागा महाविद्यालयासाठी हस्तांतरित करण्यात आली, या जागेवर जवळपास १७ हजार चौरस मीटरवर इमारत बांधकाम होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उर्वरित जागेत वाहनतळ, अधिकाऱ्यांची निवासस्थाने होणार आहेत. या इमारतीसाठी वनविभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाले असून, भूजल सर्वेक्षण व महावितरणकडे अर्ज दाखल करण्यात आल्याचे अधिष्ठता डॉ. चक्रधर मुंगल यांनी सांगितले. इमारतीचे काम २७ महिन्यांत पूर्ण करण्याची अट टाकण्यात आली आहे.