हिंगोली : जिल्ह्यात अद्याप सर्वदूर एकही मोठा पाऊस झाला नाही. परंतु, जेथे पेरणीयोग्य पाऊस झाला तेथील जवळपास शेतकऱ्यांनी शंभर टक्के खरिपाची पेरणी केली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. चार दिवसांत पाऊस न झाल्यास खरिपाची केलेली पेरणी वाया जाते की काय ? आणि दुबार पेरणीचे संकट ओढवते की काय, या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे.
जिल्ह्यात खरीप पिकाचे क्षेत्र ३ लाख ५६ हजार आहे. ७ जुलैअखेर ३ लाख २३ हजार ३४९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. २ लाख ५६ हजार ४९४ हेक्टरवर सोयाबीनचा, तर ४५ हजार ३०६ हेक्टर क्षेत्रावर हळद, व ३८ हजार ८२१ हेक्टर क्षेत्रावर तूर, कापूस व इतर पिकाचा पेरा होईल, असा अंदाज कृषी विभागाने बांधला होता. आतापर्यंत २ लाख ३१ हजार २४३ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. कृषी विभागाकडून दर गुरुवारी पीक पेरणी बाबतचा अहवाल येतो. तो मिळाल्यानंतरच प्रत्यक्ष झालेल्या पेरणीची आकडेवारी मिळू शकेल, असे सांगण्यात आले.
जिल्ह्यात आतापर्यंत मोठा पाऊस झाला नसल्याने अद्याप तरी नदी, नाल्यांना पूर आला नाही. परिणामी विहिरी, विंधन विहिरींच्या पाणीपातळीत अपेक्षित वाढ झाली नाही. जेमतेम पावसावर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकाची पेरणी केली. मात्र, सद्यस्थितीत पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पिकाच्या वाढीसाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. बागायती शेतकरी ठिबकद्वारे पिकांना पाणी देताना दिसतो आहे. मात्र, कोरडवाहू शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पिकाची उगवण चांगली झाली. परंतु, पाऊस नसल्यामुळे पिके आता सुकून जाण्याच्या मार्गावर आहेत.
हुमणीचा प्रादुर्भाव
जिल्ह्यातील सर्वच भागांतील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. सोयाबीन, हळद पिकावर हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याचे चित्र आहे. पाऊस नसल्याने खरीप हंगाम वाया जातो की काय? या चिंतेत शेतकरी पावसासाठी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.