हिंगोली : जिल्ह्यातील येलदरी, इसापूर धरणामधून रविवारी सकाळी पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असून नदी, नाल्याकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी नुकसानीचा आढावा घेऊन पूर परिस्थिती असलेल्या गावांकडे विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना तालुकास्तरीय यंत्रणांना दिल्या आहेत.
वसमत व कळमनुरी तालुक्यातील काही गावांमधून गावकऱ्यांना शाळा, ग्रामपंचायत कार्यालयात स्थलांतरीत करण्यात आले आहे. येलदरी क्षेत्रात जोरदार पाऊस झाला असून, धरणात पाण्याचा येवा वाढत आहे. परिणामी रविवारी सकाळी येलदरी धरणाचे चार दरवाजे एक मिटरने उघडण्यात आले. सहा दरवाजे ०.५ मीटरने उघडण्यात आले आहे. तर स्लिपवे गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून, येलदरी धरणातून एकूण ३२ हजार १८० क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. येलदरीतून विसर्ग होत असल्याने पाण्याची आवक वाढली आहे. सिद्धेश्वरचे ४ दरवाजे ०.९१ मीटरने तर १० दरवाजे ०.६१ मीटरने उघडण्यात आले आहे. धरणातून २५ हजार ६३८ क्युसेक पाण्याचा पूर्णा नदीच्या पात्रात विसर्ग केला जात आहे. त्यामुळे पूर्णा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
इसापूर धरणाचे १३ दरवाजे ०.५० मीटरने उघडण्यात आले असून, २२ हजार ६२ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे पैनगंगा नदीच्या पात्रात पाणी वाढत आहे. या तीनही धरणात पाण्याची आवक लक्षात घेऊन विसर्गवाढ केली जाणार असल्याचे पूर्णा पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी वसमतसह कळमनुरी तालुक्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला असून नदी, नाल्याकाठच्या गावांकडे विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना तालुकास्तरीय यंत्रणांना दिल्या आहेत.