वसईचे समाजरंग : विशाखा कुलकर्णी

वसई-विरारमध्ये अनेक समाज एकत्र नांदतात. हे समाज आपापले संस्कार, समाजव्यवस्था, रूढी-परंपरा आजही जपत असल्याचे दिसून येते. यापैकी एक समाज म्हणजेच भंडारी समाज. वसईतील शेषवंशीय क्षत्रिय भंडारी समाजाच्या इतिहासाची ही ओळख.

वसईसारख्या ऐतिहासिक शहरात अनेक समाज, जातिधर्म एकत्र नांदताना दिसतात. केवळ लोकांचा समूह, एवढीच समाजाची व्याख्या करणे खरे तर चुकीचे ठरेल. केवळ व्यक्तींहून समाजाचे अस्तित्व निराळे आहे. अनेक व्यक्तींचा समूह आणि असे वेगवेगळे समूह एकत्र येऊन त्यांच्यात परस्पर संबंध निर्माण होतात. त्यांचे प्रादेशिक परिस्थितीनुसार ठरावीक राहणीमान असते. त्यांचे विशिष्ट संस्कार असतात, ज्याच्या चौकटीत तो समाज बांधला जातो. भारतात असे असंख्य समाज एकत्र नांदताना दिसतात. उपजीविकेसाठी स्थलांतर केल्यामुळे एक समाज भारताच्या विविध ठिकाणी जातो आणि तिथलाच होऊन राहतो, आपली वेगळी ओळख, संस्कृती निर्माण करतो.

वसईतील भंडारी समाजही वसईत आपली संस्कृती, परंपरा जपत आहे. भंडारी समाज हा भारताच्या पश्चिम भागात राहणारा समाज असून वसईतील भंडारी समाजाची कुळे पैठणहून स्थलांतरित झाल्याचे सांगितले जाते. ‘भंडारी’ या शब्दाचा उगम म्हणजे, राजाचे भांडार सांभाळण्यासाठी काही व्यक्तींची नेमणूक केली जाई. राजाच्या भांडारावर देखरेख करणारे म्हणून त्यांचे नाव भंडारी असे पडले. तिजोरीवर देखरेख करणारे किंवा तिजोरी सांभाळणारे, असाही भंडारी या शब्दाचा अर्थ होतो. भंडारी या शब्दाच्या उगमाविषयी आणखी एक अंदाज असा की पूर्वी राजाच्या विरुद्ध जे लोक बंड करत, त्यांच्याशी लढून त्यांना हरवणारे आणि बंड मोडून पडणारे ते बंडहारी. ज्याचा अपभ्रंश पुढे भंडारी असा झाला.

भंडारी जात कशी निर्माण झाली याविषयी पंडित महादेवशास्त्री जोशी यांनी एक पुराणातील कथा सांगितली आहे. त्या कथेनुसार, पूर्वी तिलकासुर नावाचा एक दैत्य अतिशय माजला होता. त्यामुळे भगवान शंकरांनी क्रोधीत होऊन त्याला घाण्यात टाकले आणि नंदीला तो घाणा फिरविण्याची आज्ञा दिली. घाणा फिरवताना नंदीला होणारे कष्ट पाहून शंकरांना घाम आला. शंकरांच्या कपाळावर त्यावेळी जो घर्मबिंदू होता, त्यापासून एक पुरुष निर्माण झाला. ज्याला भंडाऱ्यांचा मूळ पुरुष मानले जाते. या मूळ पुरुषाला शंकरांनी झाडावरील नारळ तोडून आणायची आज्ञा केली होती. ते पाणी पिऊन भगवान शंकर तृप्त झाले आणि त्या पुरुषाला भांडारप्रमुख म्हणून नेमले. असेही म्हटले जाते की या आख्यायिकेमध्ये नारळाच्या पाण्याने शंकर भगवान तृप्त झाले, त्यामुळे जिथे ताड-माड तिथे भंडाऱ्यांची वस्ती असते. यावरूनच ‘जिथे माड तिथे भंडारी’ असे म्हटले जाते.

भंडारी समाज हा मूळच्या मुंबईतील समाजांमधील एक आहे. समाजाच्या अनेक जागा मुंबईत होत्या. मुंबईतील काळबादेवी परिसरात भंडारी स्ट्रीट आहे, तेथे भंडारी समाजाचे मोठय़ा प्रमाणावर वास्तव्य होते. भंडारी समाजात अनेक पोटभेद आहेत, हे पोटभेद त्यांच्या गावांवरून,व्यवसायावरून पडले आहेत. त्यापैकी वसईतील भंडारी समाज हा शेषवंशीय क्षत्रिय भंडारी समाज आहे, हे लोक शेषाचे वंशज समजले जातात. पैठणहून स्थलांतरित झालेल्या अनेक क्षत्रिय कुळांपैकी काही कुळे ही भंडारी शेषवंशीय भंडारी समाजाची होती. यांचा मुख्य व्यवसाय ताडी-माडी तयार करणे व शेती हा आहे. भंडारी समाज हा लढवय्या समाज म्हणूनही ओळखला जातो. पूर्वी राजाच्या सैन्यात भंडारी समाज मोठय़ा प्रमाणावर असे. भंडारी समाजातीलच मायनाक भंडारी हे शिवाजी महाराजांच्या आरमारात नौदल प्रमुख होते, त्याचप्रमाणे नौदलात अनेक भंडारी युवकही होते. पोलीस दल जेव्हा अगदी सुरुवातीला तयार झाले, तेव्हा त्यात जाणारेही भंडारी समाजाचे लोक होते आणि ते आजही दलात आहेत. भारताच्या स्वातंत्र्यलढय़ातही भंडारी समाजाचा सहभाग होता. राखण करणारे-रखवालदारही भंडारी समाजात असत. भंडारी समाजात गणपतीच्या मूर्ती तयार करण्याचा व्यवसायही केला जातो.

भंडारी समाज हा कष्टकरी असल्याने या समाजाचे राहणीमान अगदी साधे आहे. भंडारी समाजाची पारंपरिक घरे ही कौलारू असतात. समाजाचा पोशाखही साध्या पद्धतीचा असतो. भंडारी समाज वसई व आजूबाजूच्या नाळे, आगाशी, बोिळज, निर्मळ, अर्नाळा, मोठा उमराळा, छोटा उमराळा, सकवाळा, सोपारा, रावार, वासळी, गिरिज, आपटण, आगाशी, धुपळवाडी, खराळे, तरखड, पापडी, चोबारे, खोचीवडे, दरपाळे या गावांमध्ये वसलेला आहे. हा समाज अल्पभूधारक असूनही समाजाने शेतीमध्ये चांगली प्रगती केली आहे. समाज आपला इतिहास जपत आज आधुनिकतेची कास मोठय़ा कष्टाने व चिकाटीने धरतो आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात समाजाने प्रगती केलेली आहे. वसईच्या समाजजीवनाचा महत्त्वाचा भाग हा भंडारी समाजाचा आहे. – Vishu1998222gmail.com