सावंतवाडी: भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी १८९४ साली सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. या आवाहनाला कोकणातून सर्वात आधी सावंतवाडी शहराने प्रतिसाद दिला. गेल्या ११९ वर्षांपासून सावंतवाडीतील सालईवाडा येथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातोय आणि यंदा या उत्सवाचं १२०वं वर्ष आहे. सालईवाडा गणेशोत्सव मंडळ आजही हा २१ दिवसांचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे.
१२० वर्षांचा गौरवशाली इतिहास
लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची हाक दिल्यावर, कोकणात सन १९०६ मध्ये कै. विष्णुशेठ सापळे आणि कै. सीतारामशेठ बांदेकर यांनी सावंतवाडीच्या सालईवाडा येथे कोकणातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापन केले. सुरुवातीला कै. केशव सापळे, कै. राजाराम बांदेकर, कै. राजाराम सापळे, कै. गोविंद विरनोडकर अशा अनेक तरुण कार्यकर्त्यांनी या उत्सवाला भव्य स्वरूप दिले.
संस्थान काळात सावंतवाडीच्या राजदरबारातून गणेशोत्सवासाठी आवश्यक सर्व साहित्य, जसे की सजावटीचे साहित्य, पालखी, सजवलेले घोडे आणि वाद्यवृंद पुरवले जात असत. यामुळे गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला एक वेगळीच शान होती. खुद्द सावंतवाडी संस्थानचे रामराजा श्रीमंत पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज हे देखील गणपतीच्या दर्शनासाठी आवर्जून येत असत. त्या काळात उत्सवामध्ये भजन, कीर्तन, प्रवचनांसोबतच प्रबोधनपर भाषणांचे आयोजनही केले जात असे.
स्वातंत्र्य संग्रामातील सहभाग:
१९४० ते १९५० च्या काळात, सि.द. पडते, अण्णा सावंत, भास्कर निखार्गे यांसारख्या तरुणांनी या गणेशोत्सवाचे नेतृत्व केले. स्वातंत्र्य चळवळीने जोर धरलेला असल्यामुळे, मंडळाने आपल्या कार्यक्रमांमधून जनजागृतीचे काम करत स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय सहभाग घेतला. त्या काळात, कै. आबा पेडणेकर हे गणपतीची आकर्षक मूर्ती आणि सजावट तयार करण्याची जबाबदारी सांभाळत. दर आठवड्याला सजावट बदलली जात असल्यामुळे शहरात या उत्सवाचे मोठे आकर्षण होते. १९५१ ते १९८० या काळात सि. द. पडते यांनी मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यानंतर १९८९-९० च्या सुमारास अमरनाथ सावंत आणि राजा स्वार यांच्या नेतृत्वाखाली मंडळाची जबाबदारी तरुणांकडे आली.
मंडळाची पुनर्बांधणी आणि नवीन वास्तू
१९९० साली श्रीमती राधाबाई केशव सापळे यांनी त्यांचे पती कै. केशव विष्णू सापळे यांच्या स्मरणार्थ, ज्या वास्तूमध्ये गणेशोत्सव सुरु झाला ती जागा मंडळाला देण्याचा निर्णय घेतला. नाना सापळे यांनी सालईवाड्यातील मान्यवरांची बैठक घेऊन हा निर्णय कळवला. त्याच बैठकीत मंडळाची रितसर नोंदणी करण्याचा आणि नवीन वास्तू बांधण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. १२ जानेवारी १९९० रोजी ती वास्तू बक्षीसपत्राद्वारे मंडळाकडे सुपूर्द करण्यात आली.
आजही २१ दिवसांचा जल्लोष:
आजही सालईवाडा गणेशोत्सव मंडळ २१ दिवस विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करते. सध्या राजा स्वार मंडळाचे अध्यक्ष असून प्रतिक बांदेकर उत्सव समिती अध्यक्ष आहेत. यंदा १२०व्या वर्षासाठी गणपतीसमोर जिल्हा परिषदेच्या शाळेचा आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे. आरती, भजनांसोबतच आरोग्य तपासणी शिबिर आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाला सावंतवाडीकरांसोबतच आसपासच्या गावातील लोक देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.