अलिबाग – रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असल्याने जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. शिक्षण विभागाला तसे निर्देश देण्यात आले आहे.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सावित्री, पाताळगंगा, अंबा नद्यांना पूर आला आहे. कुंडलिका नद्याही इशारा पातळीवर वाहत आहेत. पावसाचा जोर कायम असल्याने या नदीलाही पूर येण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक सखल भागांत पूरसदृश्यस्थिती निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

हेही वाचा – NDA च्या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “भविष्यात राष्ट्रवादी…”

हेही वाचा – लोणावळ्यात धो धो… ४८ तासांत ४३४ मिलिमीटर पावसाची नोंद

सकाळच्या सत्रात सुरू असलेल्या शाळा सुरू झाल्या होत्या. मात्र या शाळांमधील विद्यार्थ्यांना तातडीने घरी सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिक्षण विभागाला सर्व शाळांना तसा निरोप देण्यास सांगण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी म्हसे यांनी दिली.