scorecardresearch

अवैध धंदे बंद करा, जनतेचा विश्वास संपादन करा!

अवैध व्यावसायिकांवर कडक कारवाईचे आदेश त्यांनी पोलीस अधीक्षकांना दिले.

गृहमंत्री दिलीप वळसे यांचे शिर्डी पोलिसांना खडे बोल

राहाता : शिर्डीतून अनेकांच्या अवैध व्यावसायाविरुद्ध तक्रारी थेट गृहमंत्रालयाला प्राप्त झाल्याने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शिर्डीतील पोलीस इमारतीच्या उद्घाटन समारंभाच्या भाषणात शिर्डी पोलिसांच्या कारभाराविरुद्ध नाराजी व्यक्त केली. या अवैध व्यावसायिकांवर कडक कारवाईचे आदेश त्यांनी पोलीस अधीक्षकांना दिले. त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीविषयी खुद्द गृहमंत्र्यांनी भर सभेत नाराजी व्यक्त केल्याने वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी नुकतेच एक पत्र गृह खात्याला दिले असून त्यात अवैध ऑनलाईन लॉटरीच्या माध्यमातून शासनाला वर्षांकाठी वीस हजार कोटी रुपयांचा महसूल बुडत असल्याचा खुलासा करत अशा व्यावसायिकांवर कडक कारवाई करून मोठय़ा शिक्षेची मागणी केली आहे. शिर्डीसारख्या पवित्र तीर्थस्थानी जुगाराचे क्लब, मटका, लॉटरी, गावठी दारूचे दुकाने, वेश्याव्यवसाय सर्रास सुरू आहेत. गृहमंत्री वळसे यांनी भर सभेत केलेल्या वक्तव्याने आता आगामी काळात पोलीस अधिकारी कोणते ठोस पाऊल उचलणार, याबाबत उत्सुकता आहे.

शिर्डीतीलील वाढती गुन्हेगारी नेहमीच चर्चेत आहे. परंतु या गुन्हेगारीला आळा घालण्यास पोलिसांना यश येत नसल्याने शिर्डीतील जागृत नागरिकांनी थेट गृहमंत्री वळसे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल वळसे यांनी घेतली आहे. या कार्यक्रमात पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संजय सातव, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील आदी उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Home minister dilip walse patil warned shirdi police over illegal trades zws