रात्रीचे १०.३० वाजले होते. सारिका चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबाने जेवण संपवलं. सारिका त्यांच्या घरात भांडी घासत होत्या आणि आवराआवर करत होत्या. तेवढ्यात त्यांच्या लक्षात आलं की रस्त्यावर एक कुत्रा अचानक भुंकतो आहे. सारिका यांनी त्यांच्या नवऱ्याला म्हणजेच विश्वजीत यांना हाक मारली आणि काय झालंय बघ असं सांगितलं. पुणे जिल्ह्यातील यावत या ठिकाणी सारिका आणि विश्वजीत यांचं घर होतं. त्यांचा नवरा काय झालंय बघायला बाहेर गेला आणि काही क्षणांतच विश्वजीतची आरोळी सारिका यांना ऐकून आली. त्या दिशेने त्या धावल्या पण विश्वजीत यांना गुंडांनी ठार केलं. ५ मार्च २०२५ ला ही घटना पुण्यातल्या यावतमध्ये घडली. ज्या घटनेचा छडा पोलिसांनी १२ तासांत लावला. या प्रकरणात पोलिसांनी उत्तर प्रदेशातील चार जणांना अवघ्या बारा तासात अटक केली. नेमका हा छडा त्यांनी कसा लावला आपण जाणून घेऊ.
विश्वजीत यांची हत्या झाली
सारिका जेव्हा पती विश्वजीत यांच्या आरोळीच्या दिशेने धावल्या तेव्हा त्या पुढे जाताच त्यांना दिसलं की विश्वजीत खाली पडले आहेत. बाजूला एक भला मोठा दगड पडला आहे. तसंच काही जणांच्या हातात लाठ्या काठ्या आहेत आणि ते आपल्या दिशेने येत आहेत. सारिका या तातडीने पळाल्या आणि त्यांनी त्यांच्या मुलाला बेडरुममधे नेलं आणि आतून कडी लावून घेतली.
सारिका यांनी काय सांगितलं होतं?
यानंतर सारिका यांनी सांगितलं की त्यांनी त्यांची सासू उज्ज्वला आणि नणंद प्राची यांच्या किंचाळण्याचा आवाज ऐकला. या दोघींवर गुंडांनी हल्ला केला होता. त्यानंतर सारिका यांनी शेजाऱ्यांना कसाबसा फोन केला आणि मदतीसाठी बोलवलं. सारिका, तिचा मुलगा आणि सासरे बेडरुममध्ये होते. त्यांच्या बेडरुमचा दरवाजा सारिका यांनी आतून लावला होता. त्यावर जोरजोरात थाप पडत होती. पण सारिका यांनी दोघांनाही शांत रहायला सांगितलं आणि त्यादेखील शांत राहिल्या. काही वेळात शेजारी आले, त्यांनी सांगितलं आम्ही आहोत तेव्हा सारिका यांनी दार उघडलं त्यावेळी त्यांनी पाहिलं की त्यांची सासू उज्ज्वला आणि नणंद प्राची या दोघींची शुद्ध हरपली होती आणि दोघीही रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. गुंडांनी सारिका यांच्या सासऱ्यावरही हल्ला केला पण ते शुद्धीत होते. सारिका विश्वजीतच्या दिशेने धावल्या. विश्वजीत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. विश्वजीत, उज्ज्वला आणि प्राची या तिघांना रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी विश्वजीत यांना मृत घोषित केलं. तर प्राची आणि उज्ज्वला यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं.
पुणे पोलिसांना मिळालं जॅकेट आणि बॅग
या घटनेमुळे सारिका यांचं कुटुंब हादरलं. पण पोलिसांत या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली. यावत पोलीस ठाणे आणि पुणे ग्रामीण पोलीस यांनी या घटनेचा छडा लावण्यास सुरुवात केली. यानंतर प्राचीपासून विभक्त झालेल्या नवऱ्यावर संशय व्यक्त केला. प्राचीचा नवरा आणि हे कुटुंब यांच्यात आधीही वाद झाला होता. पण या तपासाला वेगळं वळण लागलं कारण हल्लेखोरांनी घरातलं सगळं सोनं घेऊन पोबारा केला होता. यावत पोलिसांनी दोन पथकं तयार केली. त्यानंतर या घटनेचे विविध पैलू तपासण्यात आले. या हल्लेखोरांना पळून जाताना दोन गावकऱ्यांनी पाहिलं होतं. ते सगळे रेल्वे ट्रॅकच्या दिशेने पळाले असं गावकऱ्यांनी पोलिसांना सांगितलं. गावकऱ्यांनी दाखवलेल्या मार्गावर पोलीस गेले तेव्हा त्यांना एक बॅग आढळळी आणि एक जॅकेट मिळालं ज्यावर युनिव्हर्सिटी दिल्ली असं लिहिलं होतं.
जॅकेट आणि बॅग ठरले महत्त्वाचा दुवा
पोलिसांना सापडलेलं हे जॅकेट आणि ती बॅग हा या प्रकरणातला महत्त्वाचा दुवा ठरला. ज्यानंतर दिल्ली आणि उत्तर भारताकडे जाणाऱ्या ट्रेन्समध्ये आम्ही तपास सुरु केला. तसंच उत्तर प्रदेशला जाणाऱ्या बसही आम्ही तपासू लागलो. येरवड्यातल्या गुंजन चौकात एका खासगी बसमध्ये आम्हाला दोन हल्लेखोर सापडले. त्यानंतर त्यांची चौकशी केली असता हे कळलं की हे दोघं बॅगेच्या शोधात मागे राहिले होते. पोलिसांनी या दोघांना अटक केली. त्यानंतर त्यांच्या साथीदारांनीही अटक करण्यात आली. सलमान शेख, मोमीन शेख, रावतसिंग तोम आणि गुलशन जहांगीर खान या चार आरोपीना पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक केली. हे सगळे उत्तर प्रदेशातील भागलपूरचे असल्याची माहितीही पोलिसांनी दिली. या चौघांनी पोलिसांना सांगितलं की विश्वजीत आणि सारिका चव्हाण यांच्या घराजवळ असलेल्या एका गुळाच्या कारखान्यात काम करत होते. चव्हाण यांच्या घरात सोनं आहे हे त्यांना माहीत होतं ते लुटून त्यांनी पळायचा कट आखला होता. पण पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर अवघ्या १२ तासांत या चौघांना अटक केली.