सातारा जिल्ह्य़ातील बोरगावचा नवा आदर्श
कृषीकर्ज म्हटले की, ते थकीत आणि त्यानंतर कर्जमाफी अशी चर्चा कायम ऐकायला मिळते, परंतु सातारा जिल्ह्य़ातील बोरगाव नावाच्या गावातील सर्व शेतक ऱ्यांनी आजपर्यंत अनेक वेळा हे कृषीकर्ज घेतले आणि प्रत्येक वेळी ते १०० टक्के भरले आहे. सध्याच्या कर्जमाफीच्या चर्चेच्या पाश्र्वभूमीवर बोरगावचा हा लौकिक सगळय़ांच्याच नजरेत भरत आहे.
बोरगाव हे वाई तालुक्यातील कृष्णा नदीच्या तीरावर वसलेले गाव. या गावाशेजारी नदीवर १९७२ साली धोम धरण झाले आणि यामध्ये गावातील मोठे शेतीक्षेत्र बुडाले. नदीलगतची शेती गेली. गाव थोडे उंचावर, डोंगर उतारी राहू लागले. उरलेली शेतीही या डोंगरउतारावरच. यामुळे त्याला पाणी देणे अशक्य झाले. यासाठी मग गावाने एका पाणी योजनेद्वारे नदीवरून या उंचीवर पाणी आणण्याचा निर्णय घेतला. यासाठी ११ लाख रुपये खर्च येणार होता. गावातील सर्व शेतकरी छोटय़ा गटातील असल्याने त्यांच्यासाठी हा खर्च मोठा होता. मग त्यासाठी स्वत:ची शेती गहाण ठेवत या शेतक ऱ्यांनी पहिल्यांदा शेतीकर्ज काढले. या कर्जातून पाणी योजना साकार झाली आणि तब्बल शंभर एकर क्षेत्र नव्याने ओलिताखाली आले. शेती सुरू होताच या शेतक ऱ्यांनी घेतलेले कर्ज फेडून टाकले. पुढे दोन वेळा या पाणी योजनेच्या विस्तारीकरणाची गरज निर्माण झाली. पुन्हा शेतकऱ्यांच्या नावे कर्ज काढण्यात आले. या विस्तारीकरणामुळे गावातील शेतीच्या पाणीपुरवठय़ात मोठी सुधारणा झाली. शेतकऱ्यांनी या पाण्याचा वापर करत पुन्हा आपले उत्पन्न वाढवले आणि हेही कर्ज फेडून टाकले. कधीकाळी या डोंगरउतारावरच्या शेतीत केवळ पावसाळी भातपीक घेतले जायचे. आता या योजनेमुळे इथले शेतकरी बाराही महिने शेती करू लागले असून स्ट्रॉबेरी, विविध फळे, पालेभाज्यांचे उत्पादन घेत आहेत.
दरम्यान, गावातील अनेक शेतक ऱ्यांनी दरवर्षी शेतातील कामे, बियाणे, खते, कीटकनाशके यासाठीदेखील विविध पतसंस्था, व्यापारी बँका, जिल्हा बँकेकडून कृषी कर्ज घेतले. पण घेतलेले हे प्रत्येक कृषीकर्ज पेडण्याची परंपरा या गावाने निर्माण केली आणि आजवर ती कसोशीने पाळली. यामुळे सद्य:स्थितीत गावातील एकाही शेतकऱ्याच्या नावावर कुठल्याही प्रकारच्या कृषीकर्जाची थकबाकी नाही.
शेतकऱ्यांनी आपले कृषी धोरण आपणच ठरवावे लागते. बाजाराचा अंदाज घेत शेतीत बदल करावे लागतात. यातून शेतीही परवडणारी होते. आम्ही आमच्या शेतीसाठी वेळोवेळी कर्ज काढले, पण ते प्रामाणिकपणे फेडलेदेखील. – लक्ष्मण वाडकर, शेतकरी, बोरगाव