भारतीय जनता पार्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथे जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे. या कार्यक्रमातून भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी काय केलं? असा सवालही राणेंनी यावेळी विचारला.

आंगणेवाडी येथे केलेल्या भाषणात नारायण राणे म्हणाले, “शिवसेना वाढायला… घडायला… आणि सत्तेत यायला… कोकणाने आधार दिला. नारायण राणेंनी आधार दिला, असं मी म्हणत नाही. पण महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यात वणवण फिरणारा कोकणी माणूसच होता. मग उद्धवा अडीच वर्षात काय केलंस रे बाबा? केवळ दोन वेळा मासे खायला आलास.”

उद्धव ठाकरेंनी कोकणात कोणताही विकास केला नाही. कोकणात एखादा प्रकल्प आला तर त्याला शिवसेनेकडून विरोध केला जातो. त्यांनी एन्रॉन प्रकल्पालाही विरोध केला. पण जेव्हा एन्रॉन प्रकल्प इथे आला तर सगळ्यात जास्त कामं कुणी घेतली? सगळ्यात जास्त गाड्या कुणाच्या होत्या? कंत्राटदार कोण होते? राजन साळवी हेही एक कंत्राटदार होते, आता ते आमदार आहेत, अशी टीका नारायण राणेंनी केली.

हेही वाचा- “तो एबी फॉर्म योग्यच”; सत्यजित तांबेंच्या आरोपांवर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, पुरावेही केले सादर

उद्धव ठाकरेंना उद्देशून राणे पुढे म्हणाले, “जिल्ह्यात एकही काम करायचं नाही, कुणाला मदत करायची नाही, गरीबांना मदत करायची नाही. कुणाच्या घरात अन्न शिजत नाही, धान्य नाहीये, हे बघायचं नाही. आताच्या शिवसेनेतील नेत्यांनी कधी पाच किलो धान्य तरी दिलं का? येथे कुपोषित बालकं आहेत. त्यातील कुणाची तरी विचारपूस केली का? त्यांचं कुपोषण घालवण्याची जबाबदारी घेतली का? असं काही करायचं नाही केवळ राणेंवर टीका करायची. कधी बालवाडी, शाळा, कॉलेज तरी काढलं का? शिक्षण क्षेत्रात आम्ही काम केलं. केवळ सरकारच्याच पैशावर काम केलं नाही.”

हेही वाचा- “चांगली पोरगी बघा अन्…”, आदित्य ठाकरेंवर टीका करताना संजय गायकवाडांचं विधान

“मी त्यांच्या प्रश्नाला उत्तर देणार नाही. जे काही द्यायचं ते मी त्याचवेळी देणार… पण हे सगळं आता मी सहन करतोय. कारण मी आता भाजपात आलोय, ही माझी अडचण आहे. भाजपात सगळी सहनशील, शांत आणि विचारसरणी मानणारे लोक आहेत. त्यामुळे मीही सगळं सहन करतोय. पण याचा कुणीही फायदा घेऊ नका,” असं टीकास्त्र राणेंनी सोडलं.