पावसाळी अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा सुरू झाला आहे. इर्शाळवाडीची दुर्घटना, राज्यातील पूरस्थिती, आमदार निधीवाटपाच्या मुद्द्यांवरून विधानसभा आणि विधान परिषदेत खडाजंगी झाली. विरोधक-सत्ताधारी आमने-सामने आले. या विविध मुद्द्यांवरून विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपलेली असतानाच विधानभवन परिसरातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि पुन्हा एकदा राजकीय नाट्याबाबत दबक्या आवाजात चर्चा होऊ लागली. अजित पवार गटाचे नेते सुनिल तटकरे आणि शरद पवार गटाचे जयंत पाटील यांच्यातील हास्यविनोद एका छायाचित्रात टिपण्यात आल्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. मात्र, या फोटोवरून जयंत पाटलांनी माध्यमांशी संवाद साधत स्पष्टीकरण दिलं आहे.

राष्ट्रवादी पक्षाचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, “ते वेगळ्या पक्षाचे आहेत, मी वेगळ्या पक्षाचा आहे. सभागृहात वेगवेगळ्या पक्षाचे अनेक लोक एकमेकांना भेटतात. त्यामुळे त्यांच्यात व्यक्तिगत संबंध असू शकतात. त्याचा राजकीय अर्थ काढण्यात अर्थ नाही. राजकारण हे राजकारण असतं. महाराष्ट्रातील अनेक पक्षातील नेत्यांशी माझे चांगले संबंध आहेत. याचा राजकीयदृष्ट्या अर्थ काढणे योग्य नाही. अगदी राज्याच्या सगळ्याच लोकांबद्दल सगळ्यांशी संबंध आहेत. ओळख प्रत्येकाशी असते. त्याचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. मी शरद पवारांसोबत ठामपणाने आहे. राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांसोबत आहे. आमच्यात खासगीत विनोद झाला. त्यामुळे तो प्रसंग घडला. त्यामुळे गैरसमज काढण्याची गरज नाही.”

“आता अजित पवारांसोबत गेलेले ६ आमदार हे माझ्यासोबत लॉबीत बसलेले होते. ३ आमदारांनी माझ्यासोबत जेवण केले. याचा अर्थ काही वेगळा होत नाही. त्यामुळे कोणीही गैरसमज निर्माण करू नका”, असेही त्यांनी सांगितले.

“शरद पवारांसोबत आम्ही एकनिष्ठ आहोत, प्रामाणिक आहोत. ते घालून देतील तीच दिशा आमच्यासाठी असणार आहे . विधानसभेच्या परिसरात चोरून फोटो काढण्याची पद्धत बंद झाली पाहिजे. मी कबुलच करतो की आमच्या दोघांत विनोद झाला. त्याचा कोणताही राजकीय अन्वयार्थ काढू नये”, असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

सर्व आमदारांच्या मतदारसंघात निधीवाटप

दरम्यान, निधी वाटपात दुजाभाव झाल्याचे वृत काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते यावर भाष्य करताना जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांच्या मतदारसंघात निधी वाटप झालेला दिसत आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांचा शहरी मतदारसंघ आहे त्यामुळे नगरविकास खात्यामार्फत त्यांना निधी मिळू शकतो.