अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच कॅबिनेट मिटिंगमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. एवढंच नाही तर आपण या सरकारमध्ये विकासाच्या मुद्द्यासाठीच आलो आहे असंही त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. नरेंद्र मोदी हे देशाचा विकास करत आहेत २०२४ च्या निवडणुकांमध्ये त्यांना पर्याय नाही असंही अजित पवार म्हणाले आहेत. तसंच राष्ट्रवादी सरकारमध्ये आल्याने कुणीही नाराज नाही असंही अजित पवार म्हणाले आहेत.
काय म्हटलं आहे अजित पवार यांनी?
“कॅबिनेट काही आम्हाला नवी नाही. काही वेगळं वाटलं नाही. कारण एकनाथ शिंदे आणि मी अडीच वर्षे सत्तेत होतोच. शिवाय भाजपात असे काही मंत्री आहेत उदाहरणार्थ राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्यासह आम्ही काम केलं आहे. त्यामुळे पहिल्या कॅबिनेटबाबत आम्हाला काही विशेष वाटलं नाही. राज्यातल्या महत्त्वाच्या प्रश्नांवर आम्ही चर्चा केली. मला काही फार काही वेगळं वाटलं नाही.”
हे पण वाचा- “शरद पवारच राष्ट्रवादीचे अध्यक्ष, अजित पवार काय म्हणतात त्या गोष्टीला…”, नाना पटोलेंची टीका
विकासाच्या मुद्द्यावरच मी या सरकारबरोबर आलो आहे
“मी विकासाच्या मुद्द्यासाठी या सरकारच्या बरोबर आलो आहे. देशपातळीवर विचार केला तर आज नरेंद्र मोदींशिवाय देशाला पर्याय नाही. आज सगळे विरोधक विस्कळीत आहेत. देश मोदींच्या नेतृत्त्वात आगेकूच करतो आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे या भावनेतून सरकारमध्ये आलो.” असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
हे पण वाचा “अजित पवारांपेक्षाही मला आश्चर्य वाटतं ते म्हणजे भुजबळ आणि…”, रोहित पवार यांचं वक्तव्य चर्चेत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आत्ता नागपूरला जात आहेत. राष्ट्रपती येत आहेत त्यांना वेलकम करण्यासाठी हे दोघे जात आहेत. धुळ्यात एक दुःखद घटना घडली आहे मात्र तिथला रिपोर्ट आम्ही घेतला आहे. तिथे गिरीश महाजन यांना आम्ही सरकारचा प्रतिनिधी म्हणून पाठवलं आहे. असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं. आम्ही आता एकत्र काम करायचं ठरवलं आहे. त्यामुळे कुठलीही नाराजी नाही. कुणालाही कसली अडचण नाही. यासंदर्भात जेव्हा एका पक्षात विस्तार होतो किंवा पदांचं वाटप होतं तेव्हा मतमतांतरं असू शकतात. मात्र सगळ्यांचं म्हणणं ऐकल्यावर अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेतील. ते तो निर्णय योग्य पद्धतीने घेतील असा मला विश्वास आहे असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.