राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आणि भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात विळ्या भोपळ्यासारखं सख्ख्य आहे. दोघांमधून मुळीच विस्तव जात नसतो. हे दोन्ही नेते एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडतना दिसत नाहीत. काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांच्या छातीत दुखू लागलं होतं. त्यांना हृदयविकाराचा त्रास झाला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने त्यांच्यासाठी एअर अँब्युलन्सची व्यवस्था केली. मात्र एकनाथ खडसे यांच्या या आजारपणावर गिरीश महाजन यांनी शंका उपस्थित केली. त्यावर आता एकनाथ खडसेंचा व्हिडीओ समोर आला आहे. गिरीश महाजन यांना जोड्याने मारेन असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

काय म्हटलं आहे एकनाथ खडसे यांनी?

“गिरीश महाजन यांनी माझ्या आजारावर प्रतिक्रिया दिली. मला वाटतं त्यांचं वय साठ वर्षांचं होत आलंय त्यामुळे साठी आणि बुद्धी नाठी असं होतंय. त्यामुळे त्यांना काही सुचत नाही असं दिसतंय. वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना त्यांनी स्त्रीरोगांकडे जास्त लक्ष दिलं त्यामुळे त्यांचं हृदयरोगांकडे कमी लक्ष गेलं. त्यांना जर खात्री करायची असेल तर माझी कागदपत्रं तपासावीत त्यात कार्डिअॅटिक अरेस्ट काय असेल तो देखील पाहून घ्यावा. माझं हृदय बंद पडलं होतं. बंद पडलेलं हृदय सुरु करण्यासाठी अथक परिश्रम डॉक्टरांना करावे लागले. ७० ते ८० लाख लोकांमधून एखादा अशा अवस्थेतून परत येतो, तसा मी परत आलो. कारण संत मुक्ताबाईंचे आणि अनेकांचे आशीर्वाद माझ्या पाठिशी होते. पण आता गिरीश महाजन यांना हे कसं कळणार?” असा सवाल खडसे यांनी या व्हिडीओत केला आहे.

हे पण वाचा- “…..तर माझ्या आयुष्याचं विमान लँड झालं नसतं”, एकनाथ खडसेंचा मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन भावनिक संवाद

तर गिरीश महाजन यांना जोड्याने मारेन

एकनाथ खडसे पुढे म्हणाले, “मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटला गिरीश महाजन यांनी जे चाळे केले त्यामुळे त्यांनी हकालपट्टी झाली. आता माझं गिरीश महाजन यांना आव्हान आहे, माझ्या सगळ्या कागदपत्रांची खात्री करावी. माझा आजार खरा आहे की खोटा आहे हे त्यांनी तपासून घ्यावं. जर त्यांना हे सांगता आलं की माझा आजार खोटा आहे, सहानुभूती मिळावी म्हणून मी हे केलं आहे तर गिरीश महाजन यांनी भर चौकात मला जोडे मारावेत. पण माझी कागदपत्रं खरी आहेत हे सिद्ध झालं तर मी गिरीश महाजन यांना भर चौकात जोडे मारायला तयार आहे. मला वाटतं गिरीश महाजन माझं आव्हान स्वीकारतील आणि जोडे खायला तयार होतील. जर चुकीचं असेल तर मी जोडे खायला तयार आहे.” असं म्हणत त्यांनी आव्हान दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर एकनाथ खडसे म्हणाले, “गिरीश महाजन यांना माझ्या नावाची कावीळ झाली आहे. गिरीश महाजन यांनी खरंतर कापसावर बोललं पाहिजे. कापूस उत्पादक, केळी उत्पादक अडचणीत आहेत. मागच्या वेळी शहाणपणा केला आणि मनोज जरांगे पाटील यांना भेटायला गेले, सरकारचे संकटमोचक झाले. आता जरा पुन्हा जरांगे पाटील यांची भेट घेऊन पाहा. संकट मोचक म्हणवून घ्यायचं आणि पळ काढायचा आणि शेपूट घालायचं असं गिरीश महाजन करत आहेत.” असंही खडसे म्हणाले.