किल्लारीला जेव्हा भूकंप झाला तेव्हा मी दहावीत होते, शरद पवार हे त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यावेळी अभ्यासक्रमात ‘मी पाहिलेला मुख्यमंत्री’ या विषयावर निबंध लिहायचा होता. मी शरद पवारांवर निबंध लिहीला होता, अशी आठवण महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितली आहे. औरंगाबादमध्ये माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या नागरी सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या. शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्यानमित्त हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार यांच्या सत्कार सोहळ्याला एका नियोजित कार्यक्रमामुळे येणं शक्य नव्हतं त्यामुळे या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर माझं नाव नाहीये असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. मराठवाड्याचे दोन सुपुत्र अर्थात गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख हे जर या कार्यक्रमाला असते तर कार्यक्रमाची शोभा अजून वाढली असती असं म्हणत त्यांनी या दोन नेत्यांच्या आठवणीही ताज्या केल्या.

महाराष्ट्राच्या राजकारणात पवार यांचं आडनाव ‘पावर’ म्हणून वापरलं जातं असं पंकजा मुंडे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. शरद पवार यांनी आपल्या राजकीय कर्तृत्त्वामुळे एक वेगळी उंची गाठली आहे असंही मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं आहे. आज झालेल्या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी होती.

धनंजय-पंकजा वाद सत्कार सोहळ्यातही
शरद पवारांच्या नागरी सत्कार सोहळ्यात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोन्ही नेते एकाच मंचावर आलेले बघायला मिळाले. मात्र धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात पंकजा मुंडे यांचं नाव घेणं टाळलं. पंकजा मुंडे यांनी मात्र आपल्या भाषणात धनंजय मुंडे यांचा नामोल्लेख टाळला नाही.

खरंतर हे दोन्ही नेते एकाच मंचावर आल्याचं चित्र महाराष्ट्रानं अनेक दिवसांनी पाहिलं. कायम एकमेकांच्या विरोधात बोलणारे हे बहिण भाऊ आज एकमेकांना उद्देशून काही बोलणार का? असा प्रश्न सगळ्यांच्या मनात होताच. मात्र धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचं नावही घेणं टाळलं

शरद पवार यांच्या नागरी सत्कार सोहळ्याला सगळ्याच पक्षाच्या नेत्यांची हजेरी होती. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शरद पवार यांचं कौतुक केलं. दिल्लीत असताना आम्हाला कायमच शरद पवारांचा आधार वाटला आहे त्यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शनही केलं आहे असंही खैरे यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I wrote essay on sharad pawar when i was in 10th says pankaja munde
First published on: 29-07-2017 at 20:08 IST