आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे प्रसिद्ध असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली झाली आहे. दोन महिन्यांपूर्वीच तुकाराम मुंढे यांची आरोग्य सेवा आयुक्त पदावर नियुक्ती करणयात आली होती. त्यानंतर आता मुंढे यांची बदली करण्यात आली आहे. मात्र, कोणत्या विभागात त्यांची नियुक्ती झाली, याची माहिती अद्याप समोर आली नाही.

सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस तुकाराम मुंढे यांच्यावर आरोग्य विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. डॉ. रामस्वामी एन. यांच्याकडून मुंढे यांनी पदभार स्वीकारला होता. तसेच, त्यांच्यावर राष्ट्रीय आरोग्य अभियानाचीही जबाबदारी होती. पण, दोन महिन्यातच मुंढे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्यासह सहा आयएएस अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात दौरे करुन रुग्णालयाची पाहणी केली होती. या दौऱ्यात मुंढे यांनी बेजबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावले होते. त्यामुळे काही अधिकाऱ्यांनी तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे तक्रारी केल्याची माहिती मिळत आहे. त्यातच आता तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा आदेश समोर आला आहे.