कोल्हापूर : इचलकरंजी येथील शिक्षण संस्थेत बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्याच्या पालकांनी मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. संतप्त नागरिकांनी संबंधित संस्थेच्या फलकावर दगडफेक केली. ही घटना नेमकी कशामुळे झाली याचा शोध घेत असल्याचे संस्थाचालकांनी म्हटले आहे.
यश अजित यादव ( वय १७, रा. पडवळवाडी पलूस) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो इचलकरंजी येथील एका संस्थेमध्ये बारावीचे शिक्षण घेत होता. आज सकाळी त्याने आत्महत्या केल्याचे समजल्यावर संस्थाचालकांनी यशला खाजगी रुग्णालयात नेले. तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाला होता.
इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्याचे ठरल्यावर विद्यार्थ्याचे वडील अजित यादव, चुलते, नातेवाईकांनी यास विरोध केला. ते कोल्हापुरात करण्याची मागणी त्यांनी केली. यश याची आत्महत्या नसून, हत्या असल्याचे सांगत त्यांनी संस्थाचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली. तर संस्थाचालक यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगत हा प्रकार नेमका कशामुळे, हे तपासून प्रतिक्रिया घेणार असल्याचे पत्रकारांना सांगितले.