विधानपरिषदेसाठी महाविकासआघाडीने पाठवलेली १२ आमदारांची यादी रद्द करा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार राज्यपालांना १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी नवी यादी सादर करणार आहे. महाविकासआघाडीची यादी रद्द केल्यास न्यायालयात दाद मागू, अशी प्रतिक्रिया यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
“उद्धवजी ठाकरे, आपण आमच्या कमळाला…”, आशिष शेलारांचं शिवसेना पक्षप्रमुखांना खुलं पत्र!
विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नावांची यादी दीड वर्षापूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडे महाविकासआघाडीने सादर केली होती. मात्र, यावर अद्याप निर्णय झालेला नसून ही यादी राज्यपालांनी फेटाळली नाही. याचाच अर्थ ही यादी अजुनही विचाराधीन असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
“…म्हणून मैदानही तेच राहणार” दसरा मेळाव्यावरून अंबादास दानवेंचा शिंदे गटाला खोचक टोला!
महाविकासआघाडी सरकारने सत्तेत असताना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या प्रत्येकी ४ जणांची नावं राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवली होती. राजू शेट्टी, एकनाथ खडसे, रजनी पाटील, सचिन सावंत, ऊर्मिला मातोंडकर यांच्यासह दिग्गज नेत्यांचा या यादीत समावेश होता. दरम्यान, शिंदे सरकारमधील नव्या यादीसाठी नेत्यांमध्ये चढाओढ होताना दिसत आहे. या जागांसाठी शिंदे गटातील विजय शिवतारे, रामदास कदम यांच्या नावांचा यादीत समावेश असण्याची शक्यता आहे. याशिवाय भाजपाकडून पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, चित्रा वाघ यांच्या नावांची चर्चा आहे.