भाजपा नेते किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीतील मंत्र्याविरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दोपोलीतील रिसॉर्टवरुन सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. अनिल परब यांचा हा रिसॉर्ट तोडण्यात यावा म्हणून सोमय्या दापोलीकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, कशेडी घाट या ठिकाणी सोमय्यांना पोलिसांनी अडवले आहे. तसेच पोलिसांनी सोमय्यांनी नोटीस दिली आहे.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या दापोली दौऱ्यामुळे शिवसेना-भाजपामधला संघर्ष आणखी वाढण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे दापोलीमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र सोमय्यांना दापोलीत येण्याआधीच खेड पोलिसांनी कशेडी घाटात थांबवत नोटीस देण्याचा प्रयत्न केला. खेडच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी सोमय्यांना नोटीस देण्याचा प्रयत्न केला.

“ज्या अर्थी आपण मुरुड येथील साई रिसॉर्टवर कारवाई करावी याकरता दापोली येथे आंदोलन करणार आहात. आपल्या आंदोलनामुळे दापोली येथील स्थानिक लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाल्याने स्थानिकांमध्ये रोष आहे. आपणास झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात आलेली आहे. त्या सुरक्षेस बाधा होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यासारखे कृत्य आपणाकडून होणार नाही याची खबरदारी घ्यावी. त्या अर्थी दंड प्रक्रिया संहिता कलम १४९ अन्वये आपल्यला सूचित करण्यात येते की जिल्हाधिकारी आणि जिल्हादंडाधिकारी यांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये १७ मार्च ते २२ मार्च या कालावधीत धुलीवंदन, शिवजयंती व रंगपंचमी आणि गुढीपाढवा हे सण साजरे केले जाणार असल्याने २९ मार्च पर्यंत कलम ३७(१)(३) प्रमाणे मनाई आदेश जारी केलेले असून करोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्यापही सुरू आहे. त्यामुळे आपण आपल्या मागणीबाबत सनदशीर मार्गाने न्याय मागून घ्यावा. कोणत्याही खाजगी जागेमध्ये अनधिकृत प्रवेश करु नये. आपणाकडून आणि आपल्या कार्यकर्त्यांकडून आंदोलनादरम्यान कोणतेही बेकायदेशीर कृत्य घडून दखलपात्र/अदाखलपत्र स्वरुपाचे कोणतेही गैरकृत्य घडल्यास त्यासाठी तुमच्यावर कारवाई केली जाईल,” असे पोलिसांनी दिलेल्या नोटीसीमध्ये म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, दापोली तालुक्यीतल मुरुड येथे समुद्रकिनारी असलेलं अनिल परब यांचं वादग्रस्त साई रिसॉर्ट पाडण्याची घोषणा करत किरीट सोमय्या भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांसह दापोलीत जात आहेत. मुलुंड येथील आपल्या निवासस्थानावरुन निघताना किरीट सोमय्या यांनी प्रतिकात्मक हातोडा घेऊन दापोलीच्या दिशेने कूच केली होती.