Chhagan Bhujbal : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुंद्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवरच आज बीड जिल्ह्यात ओबीसींचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला ओबीसी नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, लक्ष्मण हाके, गोपीचंद पडळकर यांच्यासह आदी नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी सूचक इशारा दिला. ‘आपल्या हक्कावर गदा येत असेल तर टक्कर देणं गरजेचं आहे’, अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी यांनी घणाघात केला.

छगन भुजबळ काय म्हणाले?

“आपल्या ओबीसीच्या मेळाव्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लोक आलेले आहेत. वेगवेगळ्या समाजाचे लोक आलेले आहेत. आपल्याकडे केवळ एकच समाज नाहीये. ते दारू आणि वाळू चोरांचे सरदार, त्यांच्याकडे एकच समाज आहे. पण आपल्याकडे ३७४ जाती आणि समाज आहेत. यांची नावं घेतली तरी अर्धा तास जाईल आणि यांना जर बोलायला वेळ दिला तर येथेच रात्र होईल”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

“आता अनेक लोक म्हणतात की आम्हाला बोलायला दिलं नाही. काही म्हणतात की आमचा फोटो बॅनरवर लावला नाही, आम्हाला मेळाव्याला बोलावलं नाही. मला त्या सर्वांना सांगायचं आहे की, अधिकार के लढाई मे निमंत्रण नहीं भेजे जाते. जिनका जमीर जिंदा है ओ खुद समर्थन में आ जाते है…”, अशी शेरो शायरी करत ‘आपल्या हक्कावर गदा आल्यावर टक्कर देणं गरजेचं आहे’, असं म्हणत छगन भुजबळ यांनी ओबीसी मेळाव्यातून सूचक इशारा दिला आहे.

“आपल्या मेळाव्यात काही लोक घुसवली असण्याची शक्यता आहे. मी असंही ऐकलं आहे की काही जण सुतळी बॉम्ब घेऊन आलेले आहेत, ते काहीतरी गडबड करतील, पण त्यांना तिथेच दाबायचं आणि पोलिसांच्या हवाली करायचं. तुम्ही कोणीही इकडे तिकडे पाहायचं नाही. शांततेने आपले नेते लोक काय सांगतात ते ऐकायचं. नेत्यांनी देखील आपले विचार कमीत कमी शब्दांत व्यक्त करायचे आहेत”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.