ठाकरे गटाने आज लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत शिवसेनेने १७ उमेदवार जाहीर केले आहेत. तर, वंचित बहुजन आघाडीनेही नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली. वंचितने परस्पर शिवसेनेबरोबरची युती तोडल्यामुळे संजय राऊतांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी यावरून प्रतिक्रिया दिली आहे. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

“प्रकाश आंबेडकर यांना आम्ही अकोल्यासह चार जागा देण्यास तयार झालोच होतो. आज जर चर्चा पुढे गेली असती तर सहावी जागाही कदाचित त्यांना दिली असती. हे आम्ही तीन पक्षांनी ठरवले होते. काहीही झाले तरी प्रकाश आंबेडकर यांना बरोबर घेण्याचे आम्ही ठरविले होते”, असं संजय राऊत यांनी सांगितले.

संजय राऊत म्हणाले की, “आघाडीत जागावाटप करताना अनेक मर्यादा येतात. तरी आम्ही क्षमतेपेक्षा जास्त जागा वंचित बहुजन आघाडीला देण्याचा प्रयत्न केला. पाच जागा त्यांना आधीच दिल्या. गरज पडल्यास सहावी जागा देण्याचेही ठरले होते. कोणत्याही परिस्थितीत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या भाजपाला मदत होणार नाही, अशी काळजी घेण्याचे ठरले होते. प्रकाश आंबेडकर यांनी नऊ उमेदवार जाहीर केले असतील तर हे महाराष्ट्राचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानाचे दुर्दैव आहे”, असे मी मानतो.

हेही वाचा >> वंचित बहुजन आघाडीच्या ‘एकला चलो रे’ भूमिकेवर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

प्रकाश आंबेडकर यांनी नागपूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. तसेच सांगलीमध्ये प्रकाश शेंडगे निवडणुकीला उभे राहिल्यास त्यांनाही पाठिंबा देऊ केला आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्याशी सामाजिक युती होऊ शकते, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. “प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या संघटनेचा निर्णय घेतला आहे. तरीही त्यांना आमच्याबरोबर घेण्याचे प्रयत्न आम्ही करत राहू. काहीही झाले तरी मविआ पूर्ण ताकदीने निवडणुकांना सामोरे जाईल”, असे संजय राऊत म्हणाले.

यावेळी संजय राऊत यांनी काँग्रेसशी सुरू असलेल्या वादावरही आपले मत व्यक्त केले. सांगलीमध्ये उबाठा गटाने चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच वायव्य मुंबईत उबाठा गटाने अमोल किर्तीकर यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. याही जागेवर काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांना दावा केलेला आहे. मात्र या दोन्ही जागा आमच्या असून आम्ही अनेक वर्षांपासून तिथे उमेदवार देत आहोत. काँग्रेसची नाराजी असले तर आम्ही चर्चेतून त्यावर तोडगा काढू, असेही संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.