scorecardresearch

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; पुण्यासहीत मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

येत्या पाच दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती.

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; पुण्यासहीत मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज
(संग्रहीत छायाचित्र)

राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला झाला आहे. मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलं आहे. मुंबईतही १० ऑगस्टपर्यंत सतर्कतेचा इशारा दिला आहे. या कालावधीत मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान आज आज पुणे आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाचा रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

हेही वाचा – CWG 2022 : बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीत भारताच्या किदांबी श्रीकांतला कांस्यपदक

मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

आज पुणे आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तर पुण्यात गेल्या २४ तासांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच येत्या तीन ते चार दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

विदर्भातही मुसळधार पाऊस

गेल्या २४ तासांत विदर्भातही मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. पूर्व विदर्भातील नागपूरमध्ये ८८.० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर चंद्रपूरमध्ये ७७.५ मिमी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर पश्चिम विदर्भातील अमरावतीत २२.० मिमी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा – दुसऱ्यांदा बलात्कारामागे पोलिसांची बेफिकिरी ; गोंदिया बलात्कार प्रकरण : पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यास टाळाटाळ, पोलीस ठाण्यातून रात्री परत पाठवणी

कोकणात पावसाचा जोर

विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राप्रमाणेच कोकणातही पावसाने जोर धरला आहे. रत्नागिरी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. तर दिवसभर पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या २४ तासांत कोकणात १५.६ ते ६४.४ मिमी. पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, येत्या पाच दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. तसेच नदी काठच्या गावांना सावध राहण्याचा इशाराही हवामान विभागाच्यावतीने देण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.