छत्रपती संभाजीनगर : अनुसूचित जाती प्रवर्गाविषयी सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेला वादग्रस्त शब्द वापरल्याने माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर, अशी चुकीची नोंद सरकारी कागदपत्री घेणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारे पत्र जलील यांनी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांना दिले आहे. संजय शिरसाट यांच्यावर जमीन व्यवहारातील आरोप करताना जलील यांनी वादग्रस्त शब्द जाणीवपूर्वक सात वेळा वापरल्याचा आरोप जलील यांच्यावर करण्यात आला होता.

आरोप करताना कोणताही शब्द मनाने वापरला नाही तर शासकीय नोंदीमध्ये जो शब्द आहे तोच वापरला. त्यामुळे आपण कोणतीही चूक केली नाही, असे स्पष्टीकरण जलील यांनी दिले होते. आज विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांची भेट घेऊन शासकीय कागदपत्रात चुकीची नोंद घेणाऱ्यांवरही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जलील यांनी केली आहे. वादग्रस्त शब्द शासकीय दप्तरी असल्यामुळे त्याचा उल्लेख करण्यात आला. ती चुकीची नोंद घेणाऱ्यांवरही कारवाई करावी, असे पत्रच त्यांनी आयुक्तांना दिले. दरम्यान, जलील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सूचना दिल्याचा आरोपही माजी खासदार जलील यांनी केला आहे.