अहिल्यानगर: शहरातील तपोवन रस्त्यावर गोळीबार केल्यानंतर पंधरा दिवसांपासून फरार असलेला माजी सरपंच भीमराव गेनुजी आव्हाड (वय ५८, नित्यसेवा, पाईपलाईन रस्ता, अहिल्यानगर) व त्याचा साथीदार राहुल विजय सांगळे (वय ३३, शिवनगर, सावेडी, अहिल्यानगर) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे येथून जेरबंद केले. या दोघांना न्यायालयाने १८ जूनपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश आज, सोमवारी दिले.

तपोवन रस्त्यावरील स्थानिक वर्चस्ववादातून प्रमोद रामदास घोडके (रा. दत्तमंदिर शेजारी, ढवणवस्ती, तपोवन रस्ता, अहिल्यानगर) याला भीमराज आव्हाड व राहुल सांगळे या दोघांसह ६ जणांनी मारहाण केली. त्यानंतर आव्हाड याने घोडकेच्या दिशेने पिस्तुलातून गोळीबार केला. त्यातून घोडके बचावला.

तोफखाना पोलिसांनी यापूर्वी तीन आरोपींना अटक केली होती. त्यानंतर चौथा आरोपी अकिल दाऊद शेख (रा. कवीजंगनगर) यालाही अटक करण्यात आली. काल रविवारी रात्री भीमराज आव्हाड व राहुल सांगळे या दोघांना अटक करण्यात आल्यानंतर आज न्यायालयापुढे हजर करण्यात आले. वकील महेश तवले व वकील संजय दुशिंग यांनी बाजू मांडली. तपासी अधिकाऱ्यांनी पाच दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आव्हाड हा पांगरमलचा (ता. अहिल्यानगर) माजी सरपंच आहे. त्याच्याविरुद्ध सन २०१७ मध्ये जिल्हा परिषद निवडणूक काळातील पांगरमल दारूकांडाचा गुन्हा दाखल आहे. याशिवाय इतरही गुन्हे दाखल आहेत. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये अकिल शेख याच्या हातातून भीमराज आव्हाड हा पिस्तूल घेत असल्याचे व गोळीबार करत असल्याचे आढळले आहे.