अलिबाग : मुंबई-गोवा महामार्गावर कोलाड ते माणगाव दरम्यान शनिवारी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यामुळे कोकणात जाणारे आणि कोकणातून येणारे प्रवासी तासंतास अडकून पडले होते. कोलाड ते माणगाव अंतर पार करण्यासाठी दोन ते अडीच तास लागत होते. शिमगोत्सवासाठी मुंबई ठाण्यातून हजारो चाकरमानी कोकणच्या दिशेने निघाले होते. त्यामुळे शुक्रवारी रात्रीपासूनच मुंबई- गोवा महामार्गावरील वर्दळ वाढली होती.
हेही वाचा : महाराष्ट्रात राज्य महामार्गाच्या तुलनेत राष्ट्रीय महामार्गावर दुप्पट अपघात ! मुंबई, पुण्यात सर्वाधिक मृत्यू
सकाळनंतर यात आणखीनच भर पडली. त्यामुळे कोलाड, इंदापूर आणि माणगाव या परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. माणगाव, इंदापूर शहरांलगत असलेला अरुंद रस्ता आणि लेनची शिस्त न पाळल्याने वाहतूक कोंडीची समस्या अधिकच बिकट झाली होती. बेशिस्त वाहन चालकांना आवर घालतांना वाहतूक पोलीसांना बरीच मेहनत घ्यावी लागत आहे.