अलिबाग : परिस्थिती बघून राजकीय युती करावी लागते, यातून कुठलाच पक्ष सुटलेला नाही. हातावर हात ठेऊन विरोध करणे हा आपला अजेंडा नाही. त्यामुळे सत्तेत बसून लोकांची कामे कशी मार्गी लागतील हे महत्वाचे आहे. आम्ही युती केली असली तरी पक्षाचा विचार सोडलेला नाही. विरोधी पक्षाचे लोक रोज वल्गना करतात. पण प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायला मी बांधिल नाही. आमची बांधिलकी लोकांशी आहे ती आम्ही ठेऊ अशी भुमिका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत येथे मांडली. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार सभेत बोलत होते.

यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, रुपाली चाकणकर, अनिकेत तटकरे, सुधाकर घारे, दत्ताजीराव मसूरकर उपस्थित होते. सध्या महाराष्ट्राचे वातावरण वेगळ्या पध्दतीचे आहे. प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार, पण इतरांच्या भावना दुखावणार नाही, समाजात तेढ निर्माण होणार नाही. जातीत वाद निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी. मराठा समाज आणि धनगर समाजाला आरक्षण हवे आहे. ओबिसी समाजालाही त्यांच्या आरक्षणाला धक्का लागू नये वाटते आहे. पण इतरांना दिलेल्या आरक्षणाला धक्का न लावता, या समाजांना आरक्षण द्यायला हवे यावर सर्वांचे एकमत आहे. तशी पाऊले सरकार टाकते असल्याचेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा : सांगलीत वंचितच्या मंचावर टिपू सुलतानची प्रतिमा, भरसभेत पोलिसांना इशारा देत प्रकाश आंबेडकर म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाच वर्षात चार वेळा नैसर्गिक संकटे आली. ठोस भुमिका घ्यावी लागेल. राज्यसरकारच्या माध्यमातून चार हजार कोटींची कामे केली जाणार आहेत. ही कामे लवकरच सुरू होतील, राज्यात १ लाख जागांची भरती प्रक्रीया सुरू केली आहे. रोजगार निर्मिती, नवीन उद्योग यावे यासाठी प्रयत्न आहे. मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे मराठी राज्यसरकारच्या माध्यमातून मराठी भाषा भवनउभारले जाणार आहे. २५० कोटी खर्चून, दीड लाख चौरस फुटाची भव्य इमारत बांधली जाणार असल्याचे त्यांनी सांगीतले. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमाकंपन्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले आहे. सरकारकडूनही त्यांना मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, रुपाली चाकणकर आणि सुधाकर घारे यांनी उपस्थितांना संबोधित केले.