जालना – यावर्षीच्या पावसाळ्यात सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टी आणि नद्या-नाल्यांना आलेल्या पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांत जालना जिल्हा मराठवाड्यात पिछाडीवर आहे. विभागीय आयुक कार्यालयातील माहितीनुसार अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत पीकहानीच्या क्षेत्रापैकी जवळपास ७४ टक्के पंचनामे मराठवाडयाच्या आठ जिल्ह्यांत झाले आहेत. यामध्ये जालना जिल्ह्यातील पिकांच्या पंचनाम्यांचे प्रमाण १४.८८ टक्के आहे.
जालना जिल्हा प्रशासनाच्यावतीने एक ऑक्टोबर रोजी दिलेल्या माहितीनुसार जून ते सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात ३ लाख ३७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यापैकी ५३ हजार ९१७ हेक्टर म्हणजे १५.९८ टक्के पंचनामे आतापर्यन्त झाले आहेत. जालना जिल्हयातील सप्टेंबर महिन्यातील पंचनामे मोठ्या प्रमाणावर बाकी आहेत.
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जालना जिल्हयात झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेले असून या काळातील मदतीसाठी १० कोटी ४० लाख रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.
सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने जिल्हयात सव्वातीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. या वर्षीच्या पावसाळ्यातील पीक नुकसानीचे क्षेत्र आतापर्यन्त एकूण तीन लाख सदतीस हजार हेक्टरपर्यत असून यामध्ये सप्टेंबरच्या शेवटी गोदावरीस आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची भर पडणार आहे. अतिवृष्टीने आतापर्यन्त जिल्हयातील सव्वासातशे गावांतील साडेचार लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
वीज पडून आणि पुरामुळे जिल्हयात सप्टेंबरपर्यन्त तीनशे पेक्षा अधिक गुरे मृत्युमुखी पडली आहेत. त्यामध्ये १७० दुधाळ गुरांचा समावेश आहे. मृत्युमुखी पडलेल्या गुरांच्या मालकांना ६४ लाख ५१ हजारांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. पूर आणि वीजा पडल्याने या पावसाळ्यात जिल्हयात नऊ व्यक्ती मृत्युमुखी पडल्या आहेत. त्यांच्या वारसांना २० लाख रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे.