अलिबाग– खोपोलीत शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतुक करणाऱ्या रिक्षा चालकाचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. एका शाळकरी विद्यार्थीनीकडे त्याने रिक्षाचे स्टेअरींग दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही विद्यार्थीनी मुख्य रस्त्यावर इतर शाळकरी मुलींना घेऊन रिक्षाचालवत असल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर सध्या व्हायरल झाली आहे. या घटनेला वाहतुक पोलीसांनी दुजोरा दिला असून, संबधित रिक्षा चालकावर कारवाईचे संकेत दिले आहेत.
खोपोलीतील रस्त्यावर एक शाळकरी अल्पवयीन मुलगी रिक्षा चालवत असल्याचे या चित्रफीतीत दिसून येत आहे. शेजारून जाणाऱ्या दुचाकीस्वाराने या घटनेचे चित्रिकरण केले आहे. ज्यात अल्पवयीन मुलगी रिक्षा चालवत असून रिक्षा चालक तिच्या शेजारी बसला आहे. अन्य शाळकरी मुली मागच्या आसनावर काहीश्या घाबरलेल्या अवस्थेत बसल्या आहेत. मुलगी बेधडकपणे रिक्षा नेत असल्याचे दिसून येत आहे. ही चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन खोपोली पोलीसांनी रिक्षा चालका विरोधात भारतीय न्याय संहीता आणि मोटर वाहन कायद्यातील विवीध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती खोपोलीचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी दिली.
