सावंतवाडी : कुडाळ तालुक्यात अनधिकृत वाळू तपासणी करणाऱ्या महसूल पथकावर एका डंपरचालकाने डंपर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नेरूर ते कुडाळ एमआयडीसी भागात हा प्रकार घडला. या प्रकरणी दोन डंपरचालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुडाळचे प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी चेंदवण आणि कवठी परिसरात अनधिकृत वाळू उत्खननासाठी उभारलेले आठ रॅम्प शनिवारी उध्वस्त केले. या कारवाईनंतर तलाठी आणि इतर कर्मचारी एका कारमधून कुडाळकडे परत येत होते. नेरूर नाका येथे आल्यावर त्यांना मालवणहून कुडाळच्या दिशेने येणारे दोन डंपर दिसले. पथकाने दोन्ही डंपरचालकांना थांबण्याचा इशारा केला, पण एका चालकाने डंपर न थांबवता पळून जाण्याचा प्रयत्न केला.
महसूल पथकाने त्या डंपरचा पाठलाग केला आणि काही अंतरावर पुढे जाऊन डंपर अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, डंपरचालकाने आपला डंपर थेट पथकाच्या कारवर घालण्याचा प्रयत्न केला. यामध्ये डंपरचे पुढील चाक कारच्या मागील चाकाला धडकले. तरीही चालक थांबला नाही आणि पुढे पळत गेला. काही अंतर गेल्यावर त्याने रस्त्यातच वाळू ओतून पुन्हा पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र महसूल पथकाने त्याला पकडले.
या घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि दोन्ही डंपरचालकांना त्यांच्या डंपरसह ताब्यात घेतले. या प्रकरणी डंपरचालक निखिल परब यांच्यावर प्राणघातक हल्ला, शासकीय कामात अडथळा आणि संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या डंपरचे चालक आप्पासाहेब मदने आणि मालक संदीप दिचोलकर यांच्या विरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यातील एका डंपरची नंबर प्लेट बनावट असल्याचेही तपासणीत समोर आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.