नांदेड : शहरालगत वसरणी परिसरात गोदावरी नदीकाठालगत पंचवटीनगर नावाची एक वसाहत आहे. गोदावरीचे ‘बॅक वॉटर’ बुधवारी नदीचे पात्र सोडून बाहेर आल्याने या वस्तीला वेढा पडला. त्यातून दोन कुटुंबांतील सहा जणांना सुखरूप बाहेर काढले.
आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन दलाच्या पथकाने या परिसरात पोहोचून बालाजी अन्नपुर्णे (वय ३२), अजय अन्नपुर्णे (२७), रेणुका अन्नपुर्णे (२०), शिवनंदा अन्नपुर्णे (४९), महालाबाई विठ्ठलराव महात्मे (७९) आणि विठ्ठलराव शेषेराव महात्मे (७९) अशा सहा जणांना सुखरूप बाहेर काढले. अग्निशमन अधिकारी के.एस. दासरे, उपअग्निशमन अधिकारी नीलेश कांबळे, बी. लांडगे, उमेश ताटे, पवळे, नरवाडे, मगरे यांनी बचाव कार्यात सहभाग नोंदवला.
दक्षिण वाहिनी गोदावरी नदी नांदेड शहराला विभागून पुढे तेलंगणा व आंध्रप्रदेशात जाते. या नदीच्या उत्तर व दक्षिण काठावर नांदेड शहर विस्तारले आहे. वसरणी हा परिसर उंच टेकडीवर असून पायथ्यापासून काही अंतरावर अगदी पूररेषेत काही वसाहती वसल्या आहेत. यात काही सरकारी, निमसरकारी तसेच खासगी काम करणाऱ्या नागरिकांचा सुद्धा रहिवास आहे. यंदा पावसाळा प्रचंड असून अजून तब्बल सव्वा महिना शिल्लक असताना वार्षिक सरासरी ओलांडून पावसाचा जोर कायम आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला झालेल्या जोरदार पावसाने विष्णुपुरी धरणाच्या वरील भागातील सर्व धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे सुद्धा १४ दरवाजे उघडून त्याद्वारे सव्वा लाख क्युसेक एवढ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू होता. शहराच्या पुढे गोदावरीवर आमदुरा बंधारा आहे. त्या बंधाऱ्यातून सोडले तेवढे पाणी लगोलग निचरा होण्यास विलंब झाल्याने पश्चजल वाढत जाऊन त्याने पात्र सोडले. परिणामी नदीकाठालगतच्या वसाहतींना पाणी येऊन टेकले. पंचवटी नगराला सुद्धा पाणी येऊन भिडले. त्यात अन्नपूर्णे व महात्मे कुटुंबातील सदस्यांना घराबाहेर निघणे कठीण झाले होते.