नांदेड : संपूर्ण देशात अधिक परीक्षा केंद्र असलेले जे मोजके चार-पाच जिल्हे आहेत, त्यात नांदेडचा समावेश आहे. येथे रविवार (दि. ४) रोजी ५६ परीक्षा केंद्रांवर तब्बल २१ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य जिल्हा समन्वयक असून यंदा प्रथमच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व शिक्षण विभागाला परीक्षा प्रक्रियेत सामावून घेण्यात आले आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी कानात एखादे डिव्हाईस तर लपवले नाही ना, याची तपासणी करण्यासाठी प्रत्येक केंद्रावर राष्ट्रीय चाचणी एजन्सीने डॉक्टर्स नेमले आहेत.
एन.ई.ई.टी. (यू.जी.) अर्थात राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (अंडर ग्रॅज्युएट) ही सरकारी, खाजगी महाविद्यालये आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक पूर्व वैद्यकीय प्रवेश परीक्षा आहे. सदर परीक्षा दरवर्षी राष्ट्रीय चाचणी एजन्सी (एन.टी.ए.) द्वारे घेतली जाते. भारतात पात्र होण्यासाठी ही सर्वात कठीण प्रवेश परीक्षांपैकी एक मानली जाते. दरवर्षी साधारण 15 लाख विद्यार्थी ही परीक्षा देत असतात. नांदेड जिल्ह्यामध्ये केंद्र असावे अशी इच्छा एकूण २६ हजार विद्यार्थ्यांनी नमूद केली होती. परंतु यावेळी शासकीय संस्थांच्या इमारती केंद्र म्हणून निवडण्यात आल्याने २१ हजार विद्यार्थ्यांची व्यवस्था होऊ शकली, असे सांगण्यात आले. दुपारी २ ते ५ या वेळेत लेखी परीक्षा होणार असली तरी रिपोर्टिंग टाईम सकाळी ११ वाजेचा असेल.
नांदेड मुख्यालयापासून ४० किलोमीटरच्या परिघात एकूण ५६ केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील वसमतचा सुद्धा त्यात समावेश आहे. पूर्वी सदर परीक्षा पार पाडण्याची जबाबदारी सीबीएसई शाळेच्या प्रमुखावर सोपवली जात असे; परंतु यंदा त्यासाठी केंद्रीय विद्यालयाच्या प्राचार्याची नियुक्ती करण्यात आली आहे. एन.टी.ए.च्या निर्देशानुसार प्रत्येक केंद्रावर एक केंद्र संचालक व एका निरीक्षकाची (ऑब्जर्वर) नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाचे सिनिअर लेक्चरर तसेच काही डाॅक्टर यांची ऑब्जर्वर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉक्टरद्वारे तपासणी
दूध पोळले की ताकही फुंकून पिले जाते, या उक्तीप्रमाणे यावेळी प्रत्येक परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी कानात तर एखादे डिव्हाईस किंवा इन्स्ट्रुमेंट लपवले नाही ना, याची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था परीक्षा केंद्रावर स्वतंत्र करण्यात येणार असून त्यांना एक तास जास्तीचा दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले.