पंढरपूर : येथील तक्रारदार यांच्या मिळकतीची रद्द केलेली नोंद प्रमाणित करण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच घेताना मंडल अधिकारी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात जेरबंद झाला. तालुक्यातील करकंब महसूल मंडलाचा मंडल अधिकारी राजेंद्र वाघमारे याला लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. वाघामारे याच्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, वाघमारे याला सोमवारी १३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, राजेंद्र वाघमारे हा करकंब महसूल मंडलाचा मंडल अधिकारी म्हणून कार्यरत असून, त्यांच्याकडे पंढरपूर मंडलाचा अतिरिक्त पदभार आहे. एका शेतकऱ्याच्या मिळकतीची नोंद तांत्रिक अडचणीमुळे रद्द झाली होती. फेर नोंद घेवून प्रमाणित करण्याची मागणी तो शेतकरी करीत होता. मात्र, वाघमारे टाळाटाळ करत होते. याबाबत काही तरी मार्ग काढा, अशी विनवणी तो शेतकरी वाघमारे याला करत होता. त्या नंतर ५० हजार रुपये द्या, अशी मागणी वाघामारे याने त्या शेतकऱ्याकडे केली. तडजोडी अंती ४० हजार देण्याचे ठरले होते.

या नंतर त्या शेतकऱ्याने पुणे लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची खातरजमा लाच लुचपत विभागाने केली. त्या नुसार संबंधित शेतकऱ्याला पैसे कुठे व कधी द्यायचे याची विचारणा करण्यास सांगितले. त्या नुसार येथील तहसील कार्यालयात भेटा, असा निरोप वाघमारे याने त्या शेतकऱ्याला दिला. त्या नुसार लाचलुचपत विभागाने सापळा लावला. ठरल्याप्रमाणे वाघमारे याने त्या शेतकऱ्याला पैसे मागितले. पैसे स्वीकारत असताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने वाघमारे याला रंगेहाथ पकडले. त्याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्याला न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली.

ही कारवाई लाचलुचपत विभाग पुण्याचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा तपास सोलापूर येथील पोलीस निरीक्षक रवींद्र लांभाते हे करीत आहेत. दरम्यान, ऐन सणाच्या दिवसात ही कारवाई झाल्याने महसूल विभागासह इतर शासकीय कार्यालयांत खळबळ उडाली आहे.