पंढरपूर : पुण्यातील धरणातून उजनी धरणात आणि भीमा नदीत येणारी आवक घटली आहे. मात्र सोमवारी आणि मंगळवारी भीमा नदीत सोडलेल्या पाण्याची आवक येत आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजता भीमा नदीत १ लाख ३५ हजार क्युसेक पाण्याची आवक आहे. शहरातील नदीकाठच्या झोपडपट्टीत पाणी गेल्याने स्थलांतरीत करण्यात आले आहे.

हेही वाचा : Nana Patole : “चुकीला माफी नाही”, विधानसभेच्या तिकीट वाटपासंदर्भात नाना पटोलेंचं मोठं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुण्यातील पावसाने विश्रांती घेतल्याने खडकवासला आणि वीर धरणातील आवक मंदावली. मंगळवारी सायंकाळी नीरा नदीत भाटघर, नीरा देवघर, गुंजवणी या धरणातून ४ हजार ५३७ क्युसेक तर वीर धरणातून पाणी सोडणे बंद केले आहे. त्याचा परिणाम नीरा नदीतून भीमा नदीत येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे. तर दुसरीकडे उजनी धरणातून दुपारी ३ वाजता भीमा नदीत १ लाख क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. मात्र हे पाणी येथील भीमा नदीत पोहचण्यास १२ ते १४ तास लागतात. त्यामुळे याचा परिणाम उद्या दिसून येणार आहे. असे असले तरी सोमवारी उजनी धरणातून सोडण्यात आलेले आणि नीरेतून सोडलेले पाणी मंगळवारी भीमा नदीत मिसळले. भीमेच्या पाण्याच्या पातळीत दुपारी वाढ झाली होती. गोपाळपूर येथील जुना दगडी पुलावर पाणी वाहत होते. त्या बाजूला असलेल्या शहरातील झोपडपट्टीधारकांना पालिकेने इशारा दिला.