राहाता : तरुणांच्या टोळक्याने केलेली मारहाण आणि बदनामीमुळे येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणाने आत्महत्या केली. याबाबत लोणी पोलीस ठाण्यात चार तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तालुक्यातील गळनिंब परिसरात मंगळवारी ही घटना घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

अनिकेत वडितके (वय १७, रा. गळनिंब) असे मयताचे नाव आहे. मृत तरुणाचा भाऊ अमोल मोहन वडितके (वय २१, रा. गळनिंब, ता. श्रीरामपूर) याने लोणी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मृत अनिकेत मोटारीतून जात असताना कोल्हार- राजुरी रस्त्यावर काही तरुणांनी अडवले. यावेळी या तरुणांनी अनिकेत यास शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली. त्याच्या वाहनात गाय आढळल्याबद्दल अनिकेतविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या वेळी त्याला समज देऊन सोडून दिले.

या घटनेनंतर मारहाण आणि बदनामीमुळे अनिकेत वैफल्यग्रस्त झाला होता. त्याने यातूनच दुसऱ्या दिवशी मंगळवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना समजताच नातेवाईकांनी त्याला तातडीने लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत व्यक्तीचा भाऊ अमोल मोहन वडितके याने दिलेल्या फिर्यादीवरून लोणी पोलिसांनी चार तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.