राहाता: शिर्डी विधानसभा मतदारसंघात विकासकामे मोठ्या प्रमाणात चालू आहेत. यापुढील काळात गुणवत्ता, आधुनिकता व शिस्त यावर भर दिला जाणार असून, ठेकेदारांनी कामाच्या दर्जावर भर द्यावा, राजकारण व ठेकेदारी एकत्र येऊ शकत नाही. पुढारी ठेकेदार होऊ शकत नाहीत. चुकीचे काम करणाऱ्याला कोणतीही माफी नाही, असा इशारा माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिला.

भारतरत्न डॉ. विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस व अभियंता दिनानिमित्त राहाता इंजिनियर्स अँड आर्किटेक्चर्स असोसिएशनच्या कार्यक्रमात डॉ. विखे बोलत होते. या वेळी संघटनेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष सचिन सदाफळ, उपाध्यक्ष दंडवते, नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ तसेच अभियंते, वास्तुविशारद उपस्थित होते.

डॉ. सुजय विखे म्हणाले, बाळासाहेब विखे पाटील यांनी शिक्षण सुविधा उपलब्ध करून दिल्याने शिर्डी मतदारसंघात मोठ्या संख्येने अभियंते तयार झाले आहेत. शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या तरुणांना रोजगाराच्या संधी देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. मतदारसंघात रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्याने ठेकेदारांना कामे मिळवण्यासाठी रस्ते शोधावे लागत आहेत. स्थानिक तरुणांना संधी देताना त्यांच्याकडून अनेकवेळा अंदाजपत्रक किंवा स्ट्रक्चरल डिझाईनमध्ये चुका होतात. असे असले, तरी स्थानिक तरुणांना कामे देताना प्राधान्य देण्यात येते. त्यासाठी त्यांनी कामांची गुणवत्ता आणि जबाबदारी जपणे गरजेचे आहे. कितीही पाऊस झाला तरी किमान दोन वर्षे रस्त्याची खडी बाहेर येऊ नये, अशा प्रकारे टिकाऊ आणि दर्जेदार काम व्हायला हवे, आधुनिकीकरणाच्या गरजा लक्षात घेऊनच काम करावे.

डॉ. विखे यांनी सांगितले, की राहाता पोलीस ठाणे, ग्रामीण रुग्णालय, गोदावरी उजवा कालवा कार्यालय व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आदी प्रकल्पांच्या इमारतीचा आराखडा अंतिम केला आहे. पोलीस ठाण्याच्या इमारतीचे काम चालू आहे. उर्वरित कामे लवकरच चालू होतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोदावरी उजवा कालवा दुरुस्तीसाठी १८० कोटी रुपयांचा निधीला तत्त्वतः मंजुरी दिल्याने पुढील महिन्यात हे काम चालू होणार आहे.

शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या शैक्षणिक संकुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने तिथे अवैध धंदे चालत होते. या रस्त्याच्या कडेला असलेले अवैध धंदे जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त केले. माझा कार्यकर्ता जवळचा असो, गाडीत बसणारा असो किंवा रोज सोबत फिरणारा असो; कोणीही चुकीचे वागले तर पोलीस त्यांच्यावर कारवाई करणार आहेत. कायद्यापुढे सर्वजण समान आहेत. मुख्याधिकारी, पोलीस, महसूल, नगरपालिका, अगदी झाडू लावणाऱ्या कर्मचाऱ्यापासून प्रत्येकाने शिस्तबद्ध वर्तन ठेवावे, बेशिस्त वर्तन सहन केले जाणार नाही, असाही इशारा डॉ. सुजय विखे यांनी दिला.