अलिबाग – विधानसभा निवडणूकीतील अलिबाग मतदार संघातील भाजपचे बंडखोर उमेदवार दिलीप भोईर आता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. २१ जून रोजी अलिबाग येथे होणाऱ्या कार्यक्रमात ते शिंदेंच्‍या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मंत्री उदय सामंत आणि भरत गोगावले , आमदार महेंद्र दळवी यावेळी उपस्थित असतील. भोईर यांचया शिवसेना प्रवेशावर भाजपच्‍या प्रतिक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नुकत्‍याच पार पडलेल्‍या विधानसभा निवडणूकी दरम्‍यान भाजपचे तत्‍कालीन जिल्‍हा उपाध्‍यक्ष दिलीप भोईर यांनी अलिबाग मतदार संघातून बंडखोरी केली होती. त्‍यांच्‍या बंडखोरीने संपूर्ण कोकणाचे लक्ष वेधून घेतले होते. या निवडणूकीत त्‍यांना तिसरया क्रमांकाची मते मिळाली. निवडणूकीनंतर आमदार महेंद्र दळवी आणि भोईर यांच्‍यात जवळीक वाढली. निवडणूकीत झालं गेलं गंगेला मिळालं असं म्‍हणत दळवी यांनीही त्‍यांना जवळ केलं आहे

निवडणूक निकालानंतर भोईर यांनी पुन्‍हा भाजप प्रवेशासाठी वरिष्‍ठ नेत्‍यांकडे प्रयत्‍न केले. परंतु स्‍थानिक पातळीवर जोरदार विरोध झाल्‍याने त्‍यांना भाजपमध्‍ये प्रवेश मिळाला नाही. विधानसभा अध्‍यक्ष राहुल नार्वेकर यांचे अत्‍यंत निकटवर्ती म्‍हणून ओळखले जाणारे भोईर यांना पुन्‍हा भाजपमध्‍ये प्रवेश न मिळाल्‍याने आश्‍चर्य व्‍यक्‍त होत आहे. अलिबागचा आमदार व्‍हायचं स्‍वप्‍न दिलीप भोईर यांनी उराशी बाळगलं आहे. तूर्ततरी आपल्‍या स्‍वप्‍नाला मुरड घालत आमदार महेंद्र दळवी यांना साथ देण्‍याचा निर्णय त्‍यांनी घेतला आहे. या निर्णयाकडे महायुतीमधील मोठा भाऊ असलेला भाजप काय प्रतिक्रिया देतो याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

दिलीप भोईर यांचा शिवसेना प्रवेश निश्चित झाला आहे. या मतदार संघात आम्‍ही दोघे एकत्र आलो तर विकासाला अधिक चालना मिळेल या हेतूने आम्‍ही हा निर्णय घेतला आहे. मागील सर्व विसरून आम्‍ही एकत्र येत आहोत. त्‍यांनी भाजपमधून बाहेर पडून अपक्ष निवडणूक लढवली होती. त्‍यामुळे त्‍यांच्‍या शिवसेना प्रवेशावर भाजपचा आक्षेप असेल असं वाटत नाही. – महेंद्र दळवी, आमदार

विधानसभा निवडणूकीत अपक्ष लढूनदेखील मला 33 हजार मतं मिळाली. निवडणूकीनंतर मी भाजपच्‍या वरिष्‍ठ पातळीपासून जिल्‍ह्यातील नेत्‍यांशी संपर्क साधला परंतु मला त्‍यांच्‍याकडून प्रतिसाद मिळाला नाही. आपल्या भागातील विकास कामे व्‍हावीत या प्रमाणिक हेतूने मी शिवसेना प्रवेश करीत आहे. – दिलीप भोईर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.