राजापूर : विधानसभा निवडणूकीच्या रणधुमाळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. मातोश्रीवर झालेल्या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यशवंतराव यांच्या हातामध्ये शिवबंधन बांधत स्वागत केले. यावेळी शिवसेना सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते आणि राजापूरचे आमदार डॉ. राजन साळवी उपस्थित होते.

यशवंतराव यांच्या पक्षप्रवेशामुळे कोकणासह राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे आणि आमदार साळवी यांची ताकद वाढणार असून त्याचा फायदा त्यांना विधानसभा निवडणूकीत होणार आहे. अभ्यासू, हुशार आणि दांडगा जनसंपर्क असलेले व्यक्तीमत्व म्हणून नावलौकीक असलेले यशवंतराव सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात कार्यरत होते. विधानसभा निवडणूकीमध्ये गेली दोन टर्म त्यांचे इच्छुक उमेदवार म्हणून सातत्याने नाव चर्चेत होते. मात्र, गतवेळी आजारपणामुळे त्यांना निवडणूक लढविता आलेली नाही. यावेळी मात्र, त्यांनी विधानसभेची जोरदार तयारी केली होती. विधानसभा निवडणूकीच्या रणधुमाळीमध्ये जागावाटप सुरू असताना त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करीत हातामध्ये ‘मशाल’ घेतली आहे. मातोश्रीवर झालेल्या या पक्षप्रवेशाच्यावेळी माजी खासदार राऊत, आमदार साळवी यांच्यासह शिवसेनेचे जेष्ठ पदाधिकारी पांडुरंग उपळकर, राजापूर तालुका संपर्कप्रमुख अभिनल भोवड यांच्यासह अन्य पदाधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

हेही वाचा : MNS List : मनसेने जाहीर केली उमेदवारांची यादी, अमित ठाकरे माहीममधून, तर वरळीतून आदित्य ठाकरेंना ‘हा’ उमेदवार देणार आव्हान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या सुमारे दोन-अडीच दशकाहून अधिक काळ समाजकारण, राजकारणामध्ये कार्यरत असलेले यशवंतराव यांचा राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघामध्ये दांडगा जनसंपर्क आहे. गावोगावच्या तळागाळातील आणि सर्वसामान्यांशी निकटचे संबंध असलेले यशवंतराव यांची हुशार आणि अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणून नावलौकीक आहे. मतदारसंघासह सर्वसामान्यांच्या विकासाला चालना देताना त्यांनी अनेक विकासकामेही मार्गी लावली आहेत. त्यांच्या या जनसंपर्काचा विधानसभा निवडणूकीमध्ये शिवसेनेसह राजापूर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार साळवी यांना फायदा होणार असून त्यातून, त्यांची पर्यायाने शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशाचे शिवसैनिकांकडून जोरदार स्वागत करण्यात येत आहे.