रत्नागिरी : लांजा तालुक्यातील कोर्ले बौद्धवाडी येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून गोवा बनावटीची २२ लाखाच्या दारूसह दोघांना पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला गोपनीय माहितीच्या आधारे गोवा बनावटीची विदेशी दारू घेऊन विक्री करण्याचे उद्देशाने काही इसम येत असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे लांजा उपविभाग परिसरात गस्त घालताना कोर्ले बौद्धवादी फाटा येथे एक हुंडाई कार (एमएच ०७ एबी १८४७) सापळा रचून थांबवण्यात आली. त्यातील इसम संशयित हालचाली करीत असताना दिसून आल्याने त्याच्या ताब्यातील साहित्याची खात्री करण्याकरिता दोन पंचांना समक्ष बोलावून चौकशी केली असता त्यांच्या ताब्यात विविध कंपनीच्या २२ लाख २१ हजार ४४० रुपये किंमतीच्या गोवा बनावटीच्या विदेशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या.
ही गोवा बनावटीची रत्नागिरी जिल्ह्यात वितरित करण्यात येणार होती. याप्रकरणी राजीव अंबाजी सावंत, रा. सावंतवाडी सिंधुदुर्ग व प्रभू साबना कामनेती, रा. सावंतवाडी, सिंधुदुर्ग याना ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त करून आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाईसाठी लांजा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक नितीन ढेरे याच्या पथकाने ही कारवाई केली.