सांगली : दानोळीचा ३२ वर्षाचा तरणाबांड नितीन कुमार पाटील. गेल्या दहा दिवसांपासून तो कोमात होता. अशा स्थितीतच त्यांने इहलोकीची यात्रा संपवित असताना दहा जणांना अवयवदान करून जीवदान दिले. त्यांचे हृदय मुंबईतील एका रूग्णाच्या शरीरात धडधडत राहणार आहे, तर अन्य अवयवाच्या माध्यमातून नऊ जणांना जग पाहण्याची संधी आणखी लाभणार आहे.

दानोळी (जि. कोल्हापूर) येथील शेतकरी कुटुंबातील नितीन गेल्या बारा वर्षांपासून फिट येण्याच्या आजाराने त्रस्त होता. आई-वडिलांनी औषधोपचार केले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हा आजार बळावला. अखेर त्याला सांगलीतील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी उपचार सुरू होते. मात्र शरीर औषधोपचाराला अपेक्षित प्रतिसाद देत नव्हते. त्यातच तो कोमात गेला. त्याच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी त्याला मेंदूमृत (ब्रेन डेड) जाहीर केले.

हेही वाचा: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा; ६ जुलै रोजी साताऱ्यात पाच दिवस मुक्काम

कुटुंबियांनी आपला तरूण मुलगा वाचू शकत नसला तरी अवयवाच्या रूपाने तो जिवंत राहू शकतो असे समजून अवयव दानाचा निर्णय घेतला. सांगलीतील रूग्णालयातून जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मिलिंद पारेख, डॉ. आनंद मालाणी, डॉ. संजय कोगेकर, डॉ. दिगंकर कोळी यांच्या वैद्यकीय पथकाने हृदय विमानाने मुंबईला पाठवले. आणि याचबरोबर यकृत, डोळे, त्वचा यांचेही दान दिल्याने दहा रूग्णांना नवे आयुष्य लाभले.